मुंबई Kolkata Police Arrested Mumbai Man : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नातेवाईक अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली केली आहे. कोलकाता पोलिसांनी मुंबईतील माहीम पश्चिम येथून मुंबई पोलिसांच्या मदतीनं संशयित आरोपी राजाराम रेगे याला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी "माहीम पश्चिम येथून राजाराम रेगे याला कोलकाता पोलिसांनी सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलं," असं सांगितलं. राजाराम रेगे हा शिवसेना भवनमध्ये कार्यरत होता, त्यासह तो भारतीय विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रेकीमध्ये राजाराम रेगेचा सहभाग : राजाराम रेगे हा संगणकाचा व्यवसाय करत असून माहीम इथं राहतो. अभिषेक बॅनर्जी यांच्या घराच्या आणि कार्यालयाच्या रेकीमध्ये राजाराम रेगेचा सहभाग असल्याचं आढळून आलं. त्यामुळे कोलकाता पोलिसांनी रेगेला अटक केली आहे. कोलकाता पोलीस आता राजाराम रेगेंची कसून चौकशी करत आहेत.
डेव्हिड कोलमन हेडलीच्या संपर्कात : राजाराम रेगे याची 26/11 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याच्यासोबत 2008 मध्ये भेट झाली. दादरमधील शिवसेना भवन इथं दोघं भेटले, अशी माहिती मिळाल्यानंतर राजाराम रेगे याची चौकशी करून 26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात याला साक्षीदार बनवले होते. त्यावेळी राजाराम रेगे काही काळासाठी भारतीय विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होता. रेगे आणि हेडली यांच्यात व्यावसायिक संबंध निर्माण होणार होते. रेगेनं हेडली समोर भागीदारीसाठी प्रस्ताव देखील ठेवला होता. 2010 मध्ये रेगे याची एन आय एनं चौकशी देखील केली होती. रेगे यानं NIA ला पूर्ण सहकार्य केलं होतं.
लष्कर ए तोयबाला करायचा होता हल्ला : "लष्कर ए तोयबाला भविष्यात सेना भवन या इमारतीवर हल्ला करायचा असल्यानं मला शिवसेना भवनात प्रवेश करायचा होता. शिवसेना भवनाचा व्हिडिओ काढला आणि तो लष्कर ए तोयबाला दिला. ते भविष्यात शिवसेना मुख्यालय आणि बाळासाहेब ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा विचार करत होते," अशी माहिती डेव्हिड हेडलीनं ऑनलाईन चौकशीत दिली. साजिद मीर यानं डेव्हिड हेडलीला राजाराम रेगे याच्याशी मैत्री करण्यास सांगितलं. त्यावेळी राजाराम रेगे सेना भवनमध्ये काम करत होता. मात्र, डेव्हिड हेडली बरोबर संपर्कात असल्याचं कळताच सेना भवनमधून रेगे याची हकालपट्टी करण्यात आली.
हेही वाचा :