कोल्हापूर Aapda Mitra News : महापूर, भूकंप, रस्ते अपघात अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो या घटनांमध्ये सर्वसामान्यांचा जीव वाचविण्याचं काम आपत्ती व्यवस्थापनातील आपदा मित्र आणि आपदा सखी करत असतात मात्र, जीवाची बाजी लावून आपत्तीत काम करणाऱ्या आपदा मित्र आणि सखी यांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्यांना साधं सुरक्षा कवच ही नाही. ना मानधन, ना सुरक्षा अशा अवस्थेत काम करणाऱ्या या स्वयंसेवकांनी आम्ही जगायचं तरी कसं? असा सवाल सरकारला केलाय.
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यातील आपत्तीचा आढावा घेतला जातो. या प्राधिकरणाकडं 2005 पासून आजतागायत 2000 स्वयंसेवक काम करत आहेत. यामध्ये 700 आपदा सखींचाही सहभाग आहे. स्वयंसेवकांना दीड महिन्याचं प्रशिक्षण देऊन बोटी चालवणं, तराबा हाकणं, दरीतील मृतदेह बाहेर काढणं, रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, यासह आपत्ती काळात कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींचं प्रशिक्षण जिल्हा आपत्ती कक्षाकडून देण्यात येतं. कोल्हापूर जिल्ह्यात 2005, 2019, 2021 आणि त्यानंतर आताही महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. देश पातळीवर असलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासोबत काम करणारी यंत्रणा जिल्हा पातळीवरदेखील असावी, यासाठी जिल्हा आपत्ती कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तसंच जिल्ह्यातील आपत्ती नियंत्रण कक्षही या ठिकाणी उभारण्यात आलाय.
सन 2019 मध्ये देशातील पहिले 'आपदा सखी' हे पथक जिल्ह्यात तयार करण्यात आले. हे सर्व स्वयंसेवक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत सातत्यानं काम करत आहेत. यातील तरुणींना दररोज अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असल्यानं आपदा मित्र आणि सखी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मात्र, या स्वयंसेवकांना मानधन आणि सुरक्षा कवच मिळत नाही. त्यामुळं दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्यांच्या कुटुंबांनाच समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं आता किमान मानधन आणि प्रत्येक आपदा मित्र आणि सखींना विमा सुरक्षा कवच मिळावं, अशी मागणी करण्यात येत आहे.
2005 साली राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन कक्ष कोल्हापुरात सुरू झालं. या कक्षाकडून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या महापुरात उल्लेखनीय काम झालं आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकार नक्कीच उपाययोजना करेन- अनिल पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री
आपत्तीसह 'या' कामातही हातभार : महापुराव्यतिरिक्त शारदीय नवरात्रोत्सव, जोतिबा यात्रा, आदी मोठ्या धार्मिक कार्यक्रमातही आपदा मित्र आणि सखी दिवसरात्र सेवा बजावतात. महापुरात तर प्राणाची बाजी लावून हे स्वयंसेवक बचाव कार्य करतात. बोट चालवणं, शोध कार्य करणं, प्रथमोपचार देणं, वाहतूक व्यवस्थापन करणं, गर्दीचं नियंत्रण करणं ही जबाबदारी ते पार पाडतात.
हेही वाचा -