कोल्हापूर President Droupadi Murmu Kolhapur Visit : लोकशाही व्यवस्थेमध्ये सहकारी संस्था मोलाचं योगदान देत आहेत. सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांना संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत अनेक महिला स्वावलंबी बनल्या. गेली 50 वर्ष कार्यरत असलेल्या वारणा समूहाच्या माध्यमातून महिलांचं सामाजिक स्थान वाढलं, ही कौतुकाची गोष्ट आहे, असं गौरवोद्गार भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी काढले, कोल्हापुरातील वारणानगर येथे वारणा महिला सहकारी उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि वारणा विद्यापीठाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या.
कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी : स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी बनला. याच जिल्ह्यातील वारणा उद्योग समूहाच्या सोहळ्याला येण्याचा आनंद आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. महिलांची ही प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्त्वाची आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनात सहकारामुळं अनेक सकारात्मक बदल होत आहेत. आपल्या सोबतच्या सर्व महिलांना या प्रगतीच्या पथावर आणणं गरजेचं आहे. लिज्जत पापडसारखे घराघरात जाणारे ब्रँडचे प्रॉडक्ट इथं बनले जातात. दुग्धउत्पादनातही वारणा समूह पुढे आहे. आता युवा पिढीनेही यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा. अनेकांच्या हाताला काम देणाऱ्या यासाठीच सरकार प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी नारीशक्तीला संबोधित करताना केलं.
राष्ट्रपतींनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पुर आरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन यांनीही देवीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींनी अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली. तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांना दिली.
कोल्हापुरी साज अन् पैठणीसोबतच 'विशेष तैलचित्र' राष्ट्रपतींना भेट : कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांना वारणा समूहाकडून खास भेटवस्तू देण्यात आल्या. कोल्हापुरी साज, पैठणी यासह छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात महिलांची उपस्थिती दर्शविणारे आणि खास महिलांनी रेखाटलेले तैलचित्र राष्ट्रपतींना भेट म्हणून देण्यात आलं.
या सोहळ्याला यांची होती उपस्थिती : राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, निपून कोरे, शुभलक्ष्मी कोरे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा
- एकनाथ खडसे यांची भाजपाकडून घोर उपेक्षा! पक्षप्रवेश टांगणीलाच, काही वेळ वाट बघून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जोमानं काम करणार - Khadse neglected by BJP
- पुण्यात चार दशकांपासून आंदेकर टोळीचं वर्चस्व; टोळी प्रमुख ते राजकारणात एन्ट्री, कशी उदयास आली टोळी? - Pune Gang War History
- आक्षेपार्ह विधान आणि हावभाव करणं पडलं महागात, नितेश राणेंवर गुन्हा दाखल - BJP MLA Nitesh Rane