म्हाळुंगे (खेड) Khalumbre Murder : पूर्वी झालेल्या भांडणातून सोमवारी (दि. 1) सायंकाळी सातच्या सुमारास खेड तालुक्यातील खालुंब्रे गावच्या हद्दीत एका तरुणाचा कोयत्यानं वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं 48 तासांत सात आरोपींना अटक केली. मावळ तालुक्यातील जांबवडे येथे ही कारवाई करण्यात आली.
सात आरोपींना अटक : गणेश अनिल उर्फ अण्णा तुळवे (वय ३० रा. खालुंब्रे, खेड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयूर अशोक पवार (वय 30, रा. समता कॉलनी, तळेगाव दाभाडे), विशाल पांडुरंग तुळवे (वय 37), रणजित बाळू ओव्हाळ (वय 22), प्रथम सुरेश दिवे (वय 21), विकास पांडुरंग तुळवे (वय 35), सनी द. रामदास तुळवे (वय २६), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय ३८, सर्व रा. खालुंब्रे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत गणेशचा पुतण्या प्रदीप ओव्हाळ (वय 21, कान्हे फाटा, वडगाव, मावळ, जिल्हा पुणे) यानं महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोयत्यानं वार करुन हत्या : फिर्यादी प्रणयसह त्याचा मामा गणेश सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून खालुंब्रे गावाकडे चालले होते. त्यावेळी गणेश मागे बसला होता. तळेगाव-चाकण रस्त्यावर खालुंब्रे गावासमोर हैदराबादी बिर्याणी हाऊस जवळ मागून दुचाकीवरून आरोपी आले. जुन्या वादातून त्यांनी गणेशच्या डोक्यात कोयत्यानं वार करून त्याचा खून केला. फियादी प्रणय प्रकरण सोडवण्यासाठी आला असता आरोपीनं त्याच्यावरही चाकूनं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतल्यानंतर सनी तुळवे, चंद्रकांत तुळवे यांना अटक करण्यात आली. मात्र, इतर आरोपी फरार झाले होते. फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अधिकारी तानाजी गाडे, विठ्ठल वाडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना आरोपी मावळ तालुक्यातील जांबवडे येथील घरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकानं आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतलं. हत्येनंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपींचा माग काढत 48 तासांत सात जणांना अटक केली. या घटनेवरुन महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास कुथे करीत आहेत.
'हे' वाचलंत का :