छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Kidney Marathon 2024 : छत्रपती संभाजीनगरमधील शहर वासियांसाठी रविवारची (18 फेब्रुवारी) सकाळ प्रेरणादायी ठरली. सर्वांची अवयव सुदृढ ठेवण्यासाठी घेण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी भाग घेत आगळावेगळा संदेश दिला. मेडिकव्हर हॉस्पिटलकडून किडनी मॅरेथॉन 2024 चे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात 3 महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णानं 5 किलोमीटर मॅराथॉन पूर्ण केले. यांच्यासह अन्य रुग्णांनीदेखील सहभाग नोंदवत अवयव दान तसंच प्रत्यारोपणाबाबत असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण धावले : जागतिक किडनी दिनानिमित्त 18 फेब्रुवारी 2024 रोजी 'किडनीथॉन 2024' या मॅराथॉन स्पर्धेचं आयोजन मेडिकव्हर हॉस्पिटल, नेफ्रॉन किडनी केअर आणि नेफ्रॉन एक्सचेन्ज ट्रान्सप्लांट प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या भागांमधून मागील काही वर्षात अवयव प्रत्यारोपण झालेले विशेष म्हणजे किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णांनी सहभाग घेतला. यामध्ये सुमन गीते (परेल) यांनी आपली मुलगी सुरेखा सानप (छ. संभाजीनगर,औरंगाबाद) यांना 16 वर्षांपूर्वी किडनी देऊन त्यांना नवीन जीवनदान दिलं. सुरेखा सानप यांनी किडनी प्रत्यारोपण झाले असतानाही 2 किलोमीटर मॅराथॉन पूर्ण केलं. तसंच राहुल जगन्नाथ आल्हड (अहमदनगर ) यांचे नुकतेच 3 महिन्याआधी किडनी प्रत्यारोपण झाले असतानाही त्यांनी 5 किलोमीटर मॅराथॉन पूर्ण केले. हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण झालेले, अवयव प्रत्यारोपण रुग्ण, तसंच अवयव दात्यांनी या मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर या सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला असल्याची माहिती मेडिकव्हर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपेन शाह यांनी दिली.
...यामुळं केलं मॅरेथॉनचं आयोजन : भारतामध्ये अनेक प्रौढांना किडनी आजार असल्याचा अंदाज आहे. मात्र, जवळपास 90 टक्के लोकांना याबद्दल माहित नाही. भारतात 3 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला किडनीच्या तीव्र आजाराचा धोका असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा आणि कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांना हा रोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळं किडनी निरोगी ठेवण्यासाठी सुदृढ जीवनशैलीचं महत्व, अवयवदान आणि किडनी प्रत्यारोपणाबद्दलची माहिती जनमानसात प्रसारित करण्यासाठी किडनिथॉनचे आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती किडनी विकार तज्ञ डॉ. सचिन सोनी यांनी दिली. ही स्पर्धा 10 कि.मी., 5 कि.मी. आणि 2 कि.मी. या गटात घेण्यात आली. यावेळी स्पर्धकांसोबत किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण, किडनी डोनर यांचा सहभाग या मॅराथॉनचे मुख्य वैशिष्ट्य होते.
हेही वाचा -