पुणे- पुणे शहरातील कल्याणी नगर येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांकडून वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजी नगर येथून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणाची देशभर चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, " बस चालक, ट्रक ड्रायव्हर तसेच ओला, उबेर चालक यांनी जर चुकीने एखाद्याला उडविले तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा होते. पण जर श्रीमंताच्या घरातील 17 वर्षाचा मुलगा पॉर्श गाडी दारू पिऊन चालवून दोन लोकांची हत्या करतो तर त्याला निबंध लिहायला सांगितलं जातं. हे निबंध लिहायला ट्रक चालकांना सांगितलं जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे दोन भागांमध्ये विभाजन करत आहेत. एक गरिबांचा भारत असून दुसरा श्रीमंतांचा भारत आहे. गरीब असो की श्रीमंत असो सर्वांना एक समान न्याय मिळाला पाहिजे, असे यावेळी गांधी म्हणाले. पुढे गांधी म्हणाले, " प्रश्न न्यायाचा आहे. गरीब असो की श्रीमंत सर्वांना समान न्याय मिळायला हवा. त्यामुळेच आम्ही लढत आहोत. आम्ही न्यायाच्या समानतेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढत आहोत," असे राहुल गांधी यांनी जाहीर केले.
आजपर्यंत काय घडले आहे?
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कल्याणीनगर येथील कार अपघातामधील अल्पवयीन मुलाबाबत धक्कादायक माहिती सांगितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, " संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता."
- कल्याणीनगर भागात भरधाव मोटार चालवून अल्पवयीन मुलाने दोघांचा बळी घेतल्या प्रकरणात कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होत. यावेळी या तिघांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला आहे. कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
- पुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी केली होती. आरोपींच्या वतीने ऍड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली.
- पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात ॲड. असीम सरोदे आणि ॲड श्रीया आवले यांनी समस्त पूणेकरांतर्फे सजग नागरिक सारंग यादवाडकर यांच्या नावाने हस्तक्षेप अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. युक्तिवादादरम्यान ॲड. असीम सरोदे म्हणाले की," एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करणं ही पोलिसांनी मुद्दाम केलेली चूक आहे. जर पब चालकाने अल्पवयीन मुलाला दारू पिण्याची परवानगी दिली नसती तर त्यानं बेधुंद पद्धतीनं कार चालवून दोघांचा जीव घेणारा अपघात केला नसता. अपघाताच्या या प्रकरणात मुद्दाम तकलादू स्वरूपाची कलमं लावून गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे सांगून सरोदे म्हणाले की दोघांचा मृत्यू झालेल्या या अपघातात भादवि कलम ३०४ अ आणि २०४ का नोंदविण्यात आला नाही? पोलिसांनी नोंदविलेला एफआयआर हा कायद्यासमोर समोर समान असतात, या तत्वाला पायदळी तुडवणारा आहे. श्रीमंत व्यक्तीच्या मुलाला वेगळा न्याय देण्याची ही प्रक्रिया पोलिसांवरील दबाव दाखवणारी आहे, असे ॲड. सरोदे म्हणाले.
- पुणे शहरातील दोन पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश दिले आहेत. पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी पुणे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानं राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ बंद केले आहेत.
- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. पहाटे १.३० नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. महिला वेटर्समार्फत रात्री ९.३० नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- बॉम्बे प्रोबिशन कायदा १९४९ आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.
हेही वाचा-
- पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शो कार नोंदणी न करताच रस्त्यावर, 40 लाखांचा टॅक्स नुसता भरणं आहे बाकी - Pune Hit and Run Case
- कल्याणीनगर अपघातात प्रकरणात आरोपीला अटक, सोसायट्यांमधून बार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप - Pune accident news
- पुण्यातील अपघातावरून तापलं राजकारण, न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Pune hit and run case