रांची : कोलकातावरुन पाटणाला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात होऊन तब्बल 7 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर 11 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना झारखंडमधील हजारीबागजवळील बरकाठा इथल्या गोरहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दलाच्या जवानांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी घटनास्थळावर बचावकार्य करत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. त्यावेळी 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं. तर गंभीर जखमी प्रवाशांना हजारीबाग इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अजित कुमार बिमल यांनी दिली.
खड्ड्यात बस उलटून झाला अपघात : कोलकाताहून पाटणाकडं जाणारी वैशाली इथली बस क्रमांक डब्ल्यू बी 76 ए 1548 ही हजारीबागजवळील बारकाठा इथल्या गोरहर इथं खड्ड्यात उलटली. या बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर बरकाठा येथील गोरहर इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात बस उलटली. इथला रस्ता एकेरी असून सहा पदरी रस्त्याचं काम सुरू असताना कंपनीनं रस्ता खराब केला आहे, असा आरोप नागरिकांनी केला.
आरडाओरडा ऐकून धावले नागरिक : बस उलटल्यानं मोठा अपघात झाल्यानं घटनास्थळावर मोठा आक्रोश झाला. त्यामुळे प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोरहर पोलीस ठाण्याच्या जवानांनी जखमींना बसमधून बाहेर काढलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. घटनेनंतर माजी आमदार जानकी यादव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले आहेत. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर गंभीर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीनं प्राथमिक उपचारानंतर हजारीबाग वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं आहे.
6 वर्षांपासून सुरू आहे रस्त्याचं काम : गेल्या दोन वर्षांत इथं 20 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गुरुवारी घडलेल्या अपघाताची घटना ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. रस्त्याच्या बांधकामाकडं दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. बार्हीचे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपाधीक्षक, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी अपघाताची माहिती घेतली. गेल्या 6 वर्षांपासून या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, मात्र 2 किमीचं बांधकामही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा :