मुंबई Jayant Patil : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव केल्यानंतर एकीकडे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला असताना विधानसभेसाठी जागा वाटप मुद्दा हा कळीचा ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षानं उरण आणि पनवेल या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केल्यानं महाविकास आघाडीमध्ये फुटीची चिन्हं दिसत आहेत.
पनवेल आणि उरण या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार : विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि नाना पटोले सांगतील तो चेहरा आपण मुख्यमंत्री पदासाठी देऊ. त्यास माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुंबई मेळाव्यात ठणकावून सांगितलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, जागा वाटपावरून तसंच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत वाद नको. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी तसंच इतर पक्षांची कामं जोमानं करायची आहेत; पण यात मिठाचा खडा पडला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षानं विधानसभेसाठी रायगडमधील पनवेल आणि उरण या दोन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा केली आहे. पनवेल मधून माजी आमदार बाळाराम पाटील तर उरण मधून व्यावसायिक प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केल्यानं महाविकास आघाडीचे नेते चक्रावून गेले आहेत.
महाविकास आघाडीत संभ्रमाची भूमिका : शेकापच्या जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्याला विश्वासात न घेता उमेदवारांची घोषणा केल्यानं महाविकास आघाडीतील नेते नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे, उरण हा विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्यानं लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी उरण या विधानसभा मतदारसंघातून मनोहर भोईर यांच्या नावाची घोषणा केली होती. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीत जागा वाटपाची सुरूवात होण्यापूर्वीच बिघाडी निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत तीन ते चार जागांवर वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडवता सोडवता फारच उशीर झाल्यानं त्याचा फटकासुद्धा लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला. आता जयंत पाटील यांच्या भूमिकेनं जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत संभ्रमाची भूमिका निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता जयंत पाटील यांनी दबावतंत्राचा अवलंब केला असून याबाबत जयंत पाटील यांनी काही भाष्य करण्यास नकार दिला असला तरीसुद्धा ते त्यांच्या मतावर ठाम असल्याचं बोललं जात आहे.
पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आताच झालेल्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. विधानसभेत संख्याबळ नसतानासुद्धा विधान परिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा करण्यासाठी शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; परंतु या निवडणुकीत जयंत पाटील यांना अपेक्षित मतं मिळाली नाहीत. या निवडणुकीत ऐनवेळी उबाठा गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यानं जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या कारणाने जयंत पाटील हे उबाठा गटावर नाराज आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांनी उबाठा गटाला मदत केली नाही. त्याकरिता उबाठा गटाची नाराजी त्यांच्यावर होती. या कारणाने लोकसभा निवडणुकीतील चूक, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत झालेली चूक यांचा वचपा काढण्यासाठी आता विधानसभेत ही रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा: