अमरावती Amravati News : सातपुडा पर्वतरांगेत जंगल आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये दूरवर असणाऱ्या आदिवासींच्या शेतात मचाणावर रात्री एखादा टिमटिमणाऱ्या दिव्याचा प्रकाश दिसतो. मचाणाखाली शेकोटी पेटवतात तसा विस्तव दुरूनच चमकतो. अनेकदा शेतांमधून रात्रीच्या अंधारात ताट, वाटी, प्याला वाजवण्याचा आवाज येतो. आदिवासींच्या धार्मिक संस्कृतीतील ही कुठलीच प्रथा नाही तर हिवाळ्यात शेतात बहरलेला गहू आणि हरभरा या पिकांचं जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक प्रयत्नांपैकी एक भाग आहे. आदिवासींचे अख्खे कुटुंब शेतातील पिकांच्या रक्षणासाठी रात्रभर शेतातील मचाणावर मुक्काम ठोकतात. रात्री शेतातील या जागरणाला मेळघाटातील आदिवासी 'जागली' असं संबोधतात. 'ई टीव्ही भारत' ने या जागली संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी आदिवासी शेतकऱ्यांच्या कृषी संस्कृतीचे अनेक आगळे वेगळे पैलू समोर आलेत.
अशी असते जागली : मेळघाटातील घनदाट जंगलात वसलेल्या अनेक गावांमधील आदिवासी बांधवांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. या भागात ऑक्टोबरच्या अखेरीस तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतात गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली जाते. जानेवारी महिन्यापर्यंत या दोन्ही पिकांनी शेत हिरवीगार होते. मेळघाटात रान डुक्कर, अस्वल हे शेतातील गहू आणि हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान करतात. अनेकदा वाघदेखील गव्हाच्या शेतामध्ये शिरतात. जंगली प्राण्यांमुळं शेताचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचं अख्खं कुटुंबच आपलं गाव सोडून थेट शेतात उंच मचाणावर मुक्काम ठोकतात. ज्यांचं शेत गावापासून दूर आहे ते पिकांची कापणी होईपर्यंत शेतातच मुक्कामी असतात. शेतामध्ये सागवानाच्या लाकडापासून जमिनीपासून आठ ते नऊ फूट उंचावर झोपडी अर्थात 'मचाण' तयार करतात. या मचाणावर कडाक्याच्या थंडीत आदिवासी शेतकरी कुटुंबाचा मुक्काम असतो. मचाणाच्या खाली लाकडं पेटवून मोठा विस्तव केला जातो. ही आग पाहून प्राणी शेतात येत नाहीत. रात्री शेतात एखादा प्राणी शिरल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यांनी सोबत आणलेली भांडे जोरात वाजवतात. आदिवासी शेतकरी जोरात ओरडून देखील जंगली श्वापदांना शेतातून पळायला लावण्याचा प्रयत्न करतात. शेतात रात्रभर प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी जे जागरण केलं जातं त्यास मेळघाटातील कोरकू बांधव 'जागली' असं म्हणतात.
'जागली'ला सुरुवात करण्याची खास प्रथा : शेतात आलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी गावातील सर्व शेतकरी हे एका विशेष दिवसाची निवड करून 'होशियार' अर्थात 'सावध व्हा' असा कार्यक्रम करतात. त्यादिवशी गावात सामूहिक जेवण केलं जातं. त्या दिवशीच्या रात्री घरातील लहान मुलं आपल्या घरातून पेटलेले लाकडं गावातील पश्चिम दिशेला एका ठिकाणी आणून ठेवतात. ही शेकोटी रात्रभर राहते आणि आदिवासी पुरुष, महिला तिच्या भवताली बसून गाणे म्हणत नाचतात. ही शेकोटी भिजल्यावर लाकडांची जी राख आणि कोळसा उरतो तो दुसऱ्या दिवशी आपल्या शेतात नेऊन मचणाच्या खाली ठेवला जातो. ही राख आणि कोळसा शेतातील पिकांचे शत्रू असणाऱ्या भूत, प्रेत, जीव जंतूंना राग करून टाकते अशी मान्यता कोरकू जमातीमध्ये आहे. शेतातील मचाणाखाली ही राख आणि कोळसा खड्ड्यात टाकल्यावरच 'जागली'ला सुरुवात होते. सध्या मेळघाटात सायंकाळच्या वेळी अनेक गावांमधून महिला लहान मुलं बऱ्याचदा आपल्या शेताकडं जाताना दिसत आहेत. हे सर्व रात्रभर आपल्या शेतात जागली करून सकाळी पुन्हा आपल्या घरी परततात. मुलं शाळेत जातात, महिला घरचे काम करतात आणि पुन्हा सायंकाळ झाली की, जागलीसाठी शेताकडे निघतात.
आमचे पीक संकटातले : रात्रीच्या काळोखात घनदाट जंगलात असणाऱ्या शेतात जागरण करून पिकांचं संरक्षण करणं हे अतिशय जोखीमीचं काम आहे. शेतात जंगली डुक्कर अस्वल वाघ दिसतात. खरंतर पीक हे आमच्यासाठी एक प्रकारे संकटाचं पीक असल्याचं, चिखलदरा तालुक्यातील महिला शेतकरी लक्ष्मी धामू आठवले सांगतात. मेळघाटात सध्या गहू आणि हरभऱ्याच्या रक्षणासाठी सगळीकडं शेतकऱ्यांचा मचाणावर मुक्काम दिसेल असंही त्यांनी सांगितलंय.
'खट्टी गोमज'ने जागली चा समारोप : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा होळी हा सर्वात मोठा सण आहे. होळी पूर्वी शेतात आलेला गहू आणि हरभरा काढून तो बाजारात विकला जातो. मात्र शेतातील हे पीक काढण्यापूर्वी 'खट्टी गोमज' अर्थात कृषी देवाची पूजा केली जाते. गावातील प्रमुख पुजारी यांनी सांगितलेल्या तिथीवर ही पूजा केली जाते. पूजेसाठी कुंकू, एखादे फळ, नारळ, गूळ, लिंबूला महत्त्व आहे. चांगल्या पिकासाठी नवस बोलला असेल तर कोंबड्याचा बळी देखील दिल्या जातो. शेतातील एका रांगेतील पीक हे देवाला अर्पण केलं जातं. यावेळी केल्या जाणाऱ्या पूजेचा प्रसाद महिलांना दिला जात नाही. ही पूजा विधी आटोपल्यावर शेतातील पीक काढण्यात येतं आणि या सोबतच जागलीचा देखील समारोप होतो. शेतातील पिकाची कापणी झाल्यावर संपूर्ण शेतात शेणाचा सडा शिंपडल्या जातो.
हेही वाचा -