नाशिक International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं नाशिकचे योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. यंदा जागतिक योगदिनानिमित्तानं मोकळ यांनी 750 किलो बर्फावर उणे 10 अंश सेल्सीअस तापमानात तब्बल 42 मिनिटे 52 आसने करुन एक आगळावेगळा उपक्रम आणि विक्रम आपल्या नावे केला आहे. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने देखील नोंद घेतली आहे. बाळू मोकळ यांनी मागील वर्षी तब्बल अर्धातास ५१ योगासन प्रात्यक्षिके कडुलिंबाच्या झाडावर केली होती. त्यांच्या या अनोख्या विक्रमामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मूळचे नांदगाव येथील असलेले बाळू मोकळ यांना पूर्वीपासून योगाची आवड होती. त्यांनी विविध ठिकाणी योगाचे शिक्षण घेऊन त्यानंतर साडे तीन वर्षे यशवंतराव चव्हाण विद्यापीठात योग संयोजक म्हणून काम केले. गत पंधरा वर्षापासून आदिवासी पाडे, वृध्दाश्रम, शाळा, महाविद्यालये, कारागृह या ठिकाणी शनिवार आणि रविवारी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. तसंच जय भवानी रोड येथे बाळू मोकळ आणि त्यांच्या पत्नी गायत्री मोकळ हे नागरिकांना योग प्रशिक्षण देतात.
वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद : योग दिनानिमित्त मोकळ यांनी बर्फावर योग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बर्फावर बसून प्रार्थनेनं सुरुवात केली, त्यानंतर योगासने करण्यास सुरुवात केली. तब्बल 42 मिनीटांमध्ये त्यांनी 52 योगासने केली. यावेळी थंडगार बर्फावरुन पाय घसरण्याची भीती असतानाही मोकळ यांनी आपला तोल जाऊ न देता योगदिनानिमित्ताने तरुणांपुढे योगाचा आदर्श घालून दिला आहे. या बर्फावरील योगासनांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे संजय आणि सुषमा नार्वेकर यांनीही दखल घेत त्यांना प्रमाणपत्र बहाल केले.
या आधी झाडावर, मोटारसायकलवर योग : बाळू मोकळ यांनी या आधी कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीवर बसून तब्बल 51 योगासनांसह 11 वेळा सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केलाय. ज्या झाडांपासून आपणास प्राणवायू मिळतो त्याच झाडांच्या सानिध्यात झाडावर योगासने केल्याचं बाळू मोकळ यांनी सांगितलं. तसच त्यांनी मोटासायकलवर देखील योगासनं केली होती. पण आता त्यांनी चक्क बर्फावर केलेल्या योगासनांची सध्या नाशिक जिल्ह्यात चर्चा होत आहे.
हेही वाचा