मुंबई International Yog Day 2024 : मुंबईकरांच्या घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या दिनक्रमामध्ये आता आरोग्यासाठीचे महत्त्वही वाढताना दिसून येत आहे. आपल्या रोजच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देण्याचा कल मुंबईकरांमध्ये आढळतो आहे. संपूर्ण मुंबईतील महानगरपालिका संचालित शिव योग केंद्रांवर दिवसेंदिवस वाढणारी प्रशिक्षणार्थी आणि लाभार्थींची आकडेवारी ही अतिशय बोलकी आहे.
योगचे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निर्देश : मुंबईतील नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचे तसेच दर्जेदार जीवनशैलीसाठी शिव योग केंद्रांची ज्या ठिकाणी मागणी आहे, अशा ठिकाणी नियमितपणे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. योग प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी नागरिकांना नियमितपणे प्रशिक्षण उपलब्ध होईल. यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या होत्या. संपूर्ण मुंबईत तब्बल 116 योग केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या ठिकाणी प्रत्येकी एक यानुसार ११६ योग प्रशिक्षक कार्यरत आहेत. सध्या ४ हजार २७८ लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच जून २०२२ पासून ते मे २०२४ अखेरीपर्यंत ३१ हजार ६२३ लाभार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.
योगचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम : WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने देखील शारीरिक आरोग्य सोबतच मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य देखील महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधांसोबतच आपल्या दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून नियमित योग केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम जाणवतो. वर्ष २०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण मुंबईत विभाग स्तरावर शिव योग केंद्रे सुरू केली आहेत.
सामाजिक कल्याणासाठी योग महत्त्वाचे : यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना, “योग - स्वत:साठी आणि समाजासाठी," ही आहे. योगमुळे केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारत नाही, तर सामाजिक कल्याणासाठी देखील योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्यांना योगविषयक माहिती आणि निरोगी आयुष्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याकरिता गतवर्षी संपूर्ण मुंबईभर योग प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.
हेही वाचा:
- १४ कोटी रुपयांचं गव्हर्मेंट शेअर्स फसवणूक प्रकरण; आरोपीच्या कोलकात्यातून आवळल्या मुसक्या - Government Shares Case
- मुंबई, संभाजीनगरासह राज्यात ठिकठिकाणी रामोजी राव यांना श्रद्धांजली; तर नागपुरात जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी आदरांजलीच्या प्रसादासाठी केला हलवा - Tribute to Ramoji Rao
- रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET