छत्रपती संभाजीनगर Tanisha Bormanikar : आज 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन' (International Chess Day 2024) आहे. कुटुंबीयांनी साथ दिली तर लहान वयात देखील यशाचे शिखर गाठता येते. मात्र, त्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते याचे उदाहरण म्हणजे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेली बुद्धिबळ पटू तनीषा बोरमणीकर. तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायची गोडी लागली, सातव्या वर्षात थेट राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. अन् तनीषाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंत मजल मारली. आतापर्यंत तिने २० आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय, ४० राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या असून अनेक ठिकाणी ती अजिंक्य राहिली आहे.
लहानपणापासून तनीषा खेळते बुद्धिबळ : तनीषा वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते. तिच्या मामाचा मुलगा खेळत असताना त्याला पाहून तिला रुची वाढली. एक दोनदा खेळल्यानंतर रस वाढला आणि तिची आवड पाहून पालकांनी खासगी शिकवणी सुरू केली. पहिली स्पर्धा खेळली आणि तिने दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळं आत्मविश्वास अधिक वाढला. सातवीमध्ये असताना राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आणि त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर खेळायला संधी मिळाली. उझबेकिस्तान येथे २०१४ मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले. २० आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ३० राष्ट्रीय, ४० राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या. कधी यश तर कधी अपयश आल्यावर काय चुकते, त्याकडं लक्ष दिलं. जिद्दीने चुका टाळण्यासाठी प्रयत्न केले आणि कमी वयात बुद्धिबळ खेळात पारंगत होत ती '६४ घरांची राणी' झाली.
खेळताना करते प्रतिस्पर्धी खेळाडूचा अभ्यास : कुठलाही खेळ खेळताना पूर्वतयारी ही करावीच लागते, तशीच तयारी तनीषाने देखील प्रत्येकवेळी केली. स्वतःचा खेळ कसा असावा यावर तिनं लक्ष केंद्रित केलं, मात्र त्याचबरोबर प्रतिस्पर्धी असलेले खेळाडू कशा पद्धतीने खेळतात, त्यांची रणनीती कशी असते. यावर देखील तिने लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं समोरची व्यक्ती खेळताना आपली कशा पद्धतीने रणनीती असावी याबाबत योग्य मांडणी करून ती सराव करते, त्यातूनच तिला यश मिळत गेले. यापुढे काय करायचं त्यापेक्षा आता जो खेळ आहे तो १०० टक्के प्रयत्न देऊन खेळायचा हे तत्व तिने अवलंबले. त्यामुळंच आज मोठ्या यशाच्या शिखरावर ती जाऊन पोहोचली आहे. आगामी काळात वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन देशासाठी खेळायचं असा मानस तनीषानं व्यक्त केला आहे.
शाळेच्या अभ्यासाचं केलं नियोजन : खेळात प्राविण्य मिळवत असताना शाळेतील अभ्यास देखील नियोजनबध्द पद्धतीनं तिनं केला. शाळेतील अभ्यास शाळेतच करायचा आणि घरी आल्यावर खेळण्याचा सराव करणे असा दिनक्रम तिनं सुरू केला. स्पर्धा आल्यावर फक्त स्पर्धेची तयारी आणि परीक्षा आल्यावर फक्त अभ्यास असं समीकरण तिनं आखलं. सब ज्युनियर नॅशनल स्पर्धा असताना दहावी परीक्षेच्या तारखा जवळपास होत्या. अभ्यासाला अवघे ५ दिवस मिळाले असताना देखील ती ९८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. तर बारावीमध्ये वर्षभर खेळण्याच्या स्पर्धा होत्या. मात्र परीक्षेच्या आधी दीड महिना फक्त अभ्यास केला आणि ९७ टक्के गुण मिळाले. खेळाचे गुण समाविष्ट केल्यावर १०० टक्के गुण मिळाले. राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला. बुद्धिबळ खेळल्यानं बुध्दी तल्लख ठेवण्यास मदत होते. खेळाचा ताण अभ्यासासाच्या ताणापेक्षा कमी असतो. एकाग्रता वाढल्यानं अभ्यास करण्यात वेळ लागत नाही. त्यामुळं खेळ आणि अभ्यासात यश मिळाल्याचं तनीषानं सांगितलं.
पालकांनी दिली साथ : खेळामध्ये प्राविण्य मिळवत असताना शाळेचा अभ्यास होणार नाही, म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना खेळाकडे जाऊ देत नाहीत. मात्र, तनीषाच्या आई-वडिलांनी तिला कधीच अडवलं नाही, उलट चांगला खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तिच्या दहावीत परीक्षा असल्यानं त्यावेळी खेळायला पाठवण्यास कुटुंबीयांनी विरोध केला, मात्र आई वडिलांनी तिचं मन आणि कल ओळखून तिला दिल्लीला खेळायला पाठवलं. तिला जग फिरायला मिळाले त्याचा अभिमान वाटतो, स्वतःच्या जीवावर तिने यश मिळवलं, प्रत्येक स्पर्धेत ती यश मिळवून आश्चर्याचा धक्का देते, असं मत तनीषाची आई रेणुका देशपांडे-बोरमणीकर आणि वडील सागर बोरमणीकर यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -
- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन 2024 : अमरावतीच्या 'या' पठ्ठ्यानं विश्वनाथन आनंदला 'पाजलं दोनदा पाणी'; जाणून घ्या जागतिक पातळीवर कसं गाजतं शहराचं 'बुद्धिबळ' ? - International Chess Day 2024
- येरवडा कारागृहात चक्क बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन, बंदीवान म्हणाले... - Yerwada Jail
- खेळाऐवजी प्रेक्षकांचं कपडे, केस अन् इतर गोष्टींकडंच लक्ष; 18 वर्षीय मराठमोळ्या बुद्धिबळपटूचा गंभीर आरोप