मुंबई Balbharati Book Poem Issue : बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात असलेल्या 'जंगल मैफल ठरली' या कवितेवरून सध्या मराठी सारस्वतात मोठा वाद सुरू झाला आहे. या कवितेत वापरण्यात आलेल्या यमक जुळवण्यासाठी करण्यात आलेल्या काही इंग्रजी शब्दांच्या वापरावरून हे वादळ सुरू आहे. याबाबत सर्व स्तरावरून टीका होत आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाची चूक - अरुण म्हात्रे : या संदर्भात बोलताना कवी अरुण म्हात्रे म्हणाले की, पूर्वी भावे यांनी लिहिलेली ही कविता त्या ज्या वातावरणात वाढल्या आहेत त्या वातावरणाचं प्रतिनिधित्व करते. त्या शहरी वातावरणात वाढल्या असल्यामुळे त्यांच्या शब्दसंग्रहात असलेले शब्द त्यांनी आपल्या कवितेत यमक जुळवण्यासाठी वापरले आहेत; मात्र मराठी भाषा शिकवताना लहान मुलांची बडबड गीते अत्यंत जबाबदारीने लिहिली पाहिजेत. त्यांनी जरी आपल्या कवितेत 'वन्स मोर' सारख्या शब्दांचा वापर केला असला तरी पाठ्यपुस्तक मंडळात या कवितेची निवड करताना निश्चितच चर्चा व्हायला हवी होती. कारण ग्रामीण भागातील शिकणाऱ्या मुलांसाठी हा शब्द आणि एकूणच हा परिप्रेक्ष नवा आहे. त्यांचा विचार करूनच याबाबत पुढे ती कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करायची की नाही हा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेणं अपेक्षित होतं; परंतु त्यांनी तसं केल्याचं दिसत नाही. ही पाठ्यपुस्तक मंडळाची चूक असल्याचं म्हात्रे यांचं म्हणणं आहे.
निवड समितीच्या बैठकीनंतरच मान्यता : या संदर्भात बोलताना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलं की, एखाद्या कवितेची अथवा लेखाची अभ्यासक्रमासाठी निवड करताना निवड समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत सर्वानुमते त्या लेखावर अथवा कवितेवर मान्यता मिळाल्यानंतरच ती अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाते. या निर्णय प्रक्रियेनंतरही त्रयस्थ व्यक्तींकडूनसुद्धा त्याची तपासणी करून घेण्यात येते. त्यानंतर त्याबाबतच्या सूचनांची तपासणी केली जाते आणि मगच ती अभ्यासक्रमात समाविष्ट होते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच या कवितेचासुद्धा समावेश करण्यात आला होता. या कवितेवर अद्याप कुणी आक्षेप घेतला नव्हता असंही ते म्हणाले.
निवड समितीला पुन्हा तपासणीचे निर्देश : या विषयावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मराठी भाषेमध्ये अनेक इंग्रजी शब्द आपण सर्रास वापरत असतो. काही इंग्रजी शब्दांना मराठीत असलेले प्रतिशब्द हे बोजड आणि उच्चाराला अवघड असतात. म्हणूनही इंग्रजी शब्दांचा वापर होतो. 'वन्स मोर' या शब्दालाही मराठीत पुन्हा एकदा हा शब्द आहे; परंतु थेट भिडेल असा शब्द नाही. त्यामुळे 'वन्स मोर' या शब्दाचा वापर कवितेत केला गेला असावा. मात्र आता या सर्व वादानंतर या कवितेबाबत पुन्हा एकदा अभ्यास गटाकडे प्रस्ताव पाठवून त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.