मुंबई Rajya Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार 400 'पार'चा नारा दिला आहे. त्यामुळं भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशात भाजपाची ताकद वाढत असून भाजपाचे खरे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अन्य पक्षांतून आलेल्यांना भाजपामध्ये समील करण्यात येत आहे. मात्र, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात ताकद वाढवण्याचा भाजपाचा निर्धार : विरोधकांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप वारंवार विरोधक करत आहे. त्यामुळं भाजपाची ताकद वाढताना दिसत असून दुसरीकडं भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपानं आधीच पकड असलेल्या राज्यांमध्ये ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकापूर्वीच भाजपा इतर पक्षांतील नेत्यांना खेचून त्यांच्याकडं जबाबदारी सोपवताना दिसत आहे.
भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते उपेक्षित : महाराष्ट्राचा विचार करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाली असून त्यांच्या मुलीलाही भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा पद्धतीचं आश्वासन भाजपानं अशोक चव्हाणांना दिल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत गुडघ्याला बाशिंग बांधून वर्षानुवर्षे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपाच्या निष्ठावंत नेत्यांवर अन्याय होत असल्याचं चित्र आहे. भाजपाकडून राज्यसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, माधव भंडारी, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र, भाजपानं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं या चर्चा थांबल्या आहेत.
दबावामुळं भाजपाचं इन्कमिंग वाढलं : महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाकडून ज्या नेत्यांना प्रवेश दिला जात आहे, त्या सर्वच नेत्यांवर भष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली तर, त्यांना योग्य तो सन्मान मिळेल, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. काल भाजपामध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांची आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशी अजूनही सुरू आहे. त्यामुळंच हा तपास टाळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.
कुठल्याही परिस्थितीत अबकी बार 400 पार : लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपानं 48 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अबकी बार 45 पार असा नारा यापूर्वीच दिला असून या जागा वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. पण गेल्या निवडणुकीत भाजपाला येथे एकही जागा जिंकता आली नाही. तसंच केरळमध्येही भाजपाची स्थिती तशीच आहे. केरळमध्ये 20 पैकी एकही जागा भाजपाला जिंकता आली नाही. तामिळनाडूतील 39 जागांपैकी भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत या तीन राज्यांतील एकूण 84 जागांपैकी भाजपाच्या खात्यात एकही जागा नसल्याने इथं जिंकण्याचा भाजपाचा निर्धार असेल.
हे वाचलंत का :