मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळी येथे मुंबई पोलिसांकडून तयारी केली होती. पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अनेक महत्त्वाचे प्रतिष्ठित व्यक्ती वरळी येथे उपस्थित होते. दरम्यान, रतन टाटा यांचा लाडका श्वान 'गोवा' यानंही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : रतन टाटा यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर) रात्री दीर्घ आजारानं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं होतं. ही बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी रुग्णालयात दाखल झाले होते. रतन टाटा यांचं पार्थिव NCPA लॉन्समध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा NCPA लॉन्सपासून वरळीतील स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. तिथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पारशी पद्धतीनं अंत्यसंस्कार : रतन टाटा यांचं पार्थिव स्मशानभूमीत दाखल झाल्यावर शोक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी टाटा कुटुंबातील मोजके सदस्य हजर होते. राज्यातील तसंच केंद्रातील मंत्री देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई पोलिसांनी टाटा यांना सलामी दिली. त्यानंतर पारशी समाजाच्या पद्धतीनं विधी करण्यात आला. त्यानंतर शवदाहिनीमध्ये रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलं व अखेर रतन टाटा हे अनंतात विलीन झाले.
दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली : रतन टाटा यांच्या निधनानं देशासह उद्योग जगताची मोठी हानी झाल्याची भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केली. राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी, उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह अनेक दिग्गजांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
अमित शाह उपस्थित : रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारावेळी केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांच्या निधनामुळं राज्यात एक दिवसाचा दुखवटा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलाय.
'उद्योगरत्न रतन टाटा पुरस्कार' : महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गत वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाचा हा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' रतन टाटांना देण्यात आला होता. आता राज्य शासनानं या पुरस्काराचं नाव बदलून 'उद्योगरत्न रतन टाटा पुरस्कार' असं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
हेही वाचा