मुंबई - आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या विचारांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येत असतात. यावर्षी देखील लाखो अनुयायांची गर्दी दादरच्या चैत्यभूमी परिसरात पाहायला मिळत असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दादर चैत्यभूमी परिसरात तैनात करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
जगाच्या पाठीवर भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ : दादरच्या शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या मुख्य उपस्थितीत आदरांजलीचा शासकीय कार्यक्रम पार पडला. आदरांजलीच्या शासकीय कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आपला देश वेगाने प्रगती करीत आहे. जगातील पाचवी अर्थव्यवस्था भारत झालाय. याचं सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्याचं आहे, जगाच्या पाठीवर भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे". कुठली समस्या देशासमोर असली तरी त्याचे निदान आणि उपाय भारताचे संविधान हेच असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे होते : पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे होते. बाबासाहेबांनी जो समता अन् बंधुतेचा संदेश दिला तो संदेशदेखील आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. सगळ्या पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ त्या काळामध्ये रोवली गेली आणि केवळ संविधान नाही तर ते संविधान अंमलात आणण्याचे व्हिजन हेसुद्धा त्यांच्यामध्ये होतं. आज देशाची अर्थनीती असेल, देशाची सिंचननीती असेल ज्या ज्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या होत्या आणि त्या आपल्याला पाहायला मिळतात."
धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं : "आपण इंदू स्मारक करीत आहोत, त्याला उशीर झालाय. अत्यंत वेगाने त्याचं काम आपल्याला करायचंय. आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरिता येतो. मी या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना पुन्हा एकदा आमचा संकल्प जाहीर करतो. तसेच हे जे कार्य आम्ही करू ते संविधानाला धरून असेल आणि काम करत असताना समाजातील जी शेवटची व्यक्ती आहे, ती वंचित आहे. त्या वंचिताचाच विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल. मी पुन्हा एकदा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून अभिवादन करतो," असं शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या कार्यक्रमात भावना व्यक्त केल्यात.
हेही वाचा :