मुंबई/हैदराबाद - अंदमानातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागनं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
या कारणानं परतीचा पाऊस होण्याचा अंदाज- हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मध्य-उष्णकटिबंधीय स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या नैसर्गिक स्थितीमुळे मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्र प्रदेशातील हवामानात बदल होत आहेत. मात्र, सध्या मध्य महाराष्ट्र आणि कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची स्थिती आहे. हा परतीचा पाऊस असल्यानं वादळी वाऱ्याची शक्यता आहे. या काळात मुंबईतील अनेक भागात अधूनमधून मुसळधार पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर, काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यतादेखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
सोमवारी मुंबईत पावसाची काय स्थिती?गेल्या काही दिवसापासून मुंबईकर उकाड्याने हैराण झाल्याचे चित्र होतं. वातावरणात आद्रतेचे प्रमाण वाढलं होतं. सोमवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली. साधारणत: एक तास सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात आणि उपनगरातील रस्त्यावर जोरदार पाणी वाहताना दिसले. मुंबई शहरात चर्चगेट, दादर, बोरवली, गोरेगाव पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. काही काळासाठी मुंबईकरांची तारांबळ पाहायला मिळाली.
देशभरातील हवामानाची काय स्थिती आहे?गेली दोन दिवस दिल्लीमधील तापमानाचा पारा वाढला आहे. पश्चिम-मध्य बंगालमधील खाडीत आज कमी दबावाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांची आज उकाड्यातून सुटका होऊ शकते. दिल्लीत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. देशाच्या काही राज्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा होत असल्यानं बंगालमध्ये येत्या दोन-तीन दिवस पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. तर दार्जिलिंग आणि कलिम्पोंगमध्ये भूस्खलन होण्याचा इशारा दिला. हवामान विभागानं ओडिशामधील 20 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.