अहमदनगर Husband Killed In Front Of Wife : पत्नीसमोर पतीवर कोयत्यानं वार करुन निर्घृण खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोथून इथं घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सुभाष शेळके असं खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. योगेश सुभाष शेळके हे मागील पाच वर्षापासून कोथून इथं आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहून शेती करत होते.
मारेकरी पहाटे अडीच वाजता शिरले घरात : कोथूळ इथं मंगळवारी पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास मारेकऱ्यांनी घराचा दरवाजा वाजवला होता. त्यामुळं योगेश सुभाष शेळके यांच्या पत्नी आरती यांनी घराचा दरवाजा उघडला होता. दरवाजा उघडताच मारेकऱ्यांनी घरात घुसून योगेश सुभाष शेळके यांच्या पत्नी आरती यांच्या गळ्याला एकानं कोयता लावल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर इतर हल्लेखोरांनी घरात घुसून योगेश सुभाष शेळके यांच्या गळ्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केलं. गळ्यावर वार झाल्यानं प्रचंड रक्तस्राव झाला. त्यामुळं योगेश शेळके यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली.
संशयावरुन दोघांना घेतलं ताब्यात : कोथूळ या गावात पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान घरात घुसून चार जणांनी योगेश शेळके यांचा निर्घृण खून केल्यानं अहमदनगर जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. "पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन तपास सुरू केला आहे. या खुनाच्या प्रकरणात बेलवंडी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत," अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दिली आहे.
कोणाशीच नव्हते वैर, तरी योगेशचा निर्घृण केला खून : योगेश शेळके यांचा गावात कोणाशीच वैर नव्हते. परिसरात त्यांची सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा अशी प्रतिमा होती. मात्र तरीही इतक्या क्रूरपणे योगेश शेळके यांचा निर्घृण खून झाल्यानं पोलीसही चक्रावले आहेत. योगेश शेळके यांच्या पत्नीनं पहाटे अडीच वाजता दरवाजा उघडण्याचं धाडस का केलं ? हा खून नाजूक कारणातून झाला, की जमिनीच्या वादातून झाला, याबाबत पोलिसांची तपासाची चक्रं फिरत आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी नुकताच पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेतला आहे. त्यानंतर लगेच ही घटना घडल्यानं त्यांच्यासमोर त्याचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
हेही वाचा :