मुंबई - वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग लागलेली आहे. टाळ-मृदूंगाच्या गजर करत मुंबईच्या विविध भागांतून या मंदिराकडे वारकऱ्यांच्या दिंड्या येत आहेत. या कारणाने येथील सारा परिसरच हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबईतील, वडाळा विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. आज विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी मुंबई व मुंबई उपनगरातील भाविक येथे उपस्थित झाले असून हरिनामाच्या गजरात ते मंत्रमुग्ध झाले आहेत. मुखी विठुरायाचे नाम जपत हे भाविक आषाढी एकादशी सार्थकी लावत आहेत.
पंचामृताने विधीवत पूजा
मुंबई, दादर पूर्वेकडील वडाळा येथील कात्रक मार्गावर असलेले हे विठ्ठल मंदिर प्रति पंढरपूर म्हणून समजले जाते. हे मंदिर सुमारे ४०० वर्ष जूने असून या परिसरात पूर्वी मिठागरे होती. येथील रहिवाशांना या मिठागरामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या अशी आख्यायिका असून त्यानंतर हे विठ्ठल मंदिर उभारले गेले. आज आषाढी एकादशी निमित्त पहाटे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पंचामृताने विधीवत पूजा करण्यात आली. मुंबईतील कुलाबापासून ते लालबाग, दादर, परळ, काळाचौकी अशा विविध भागांतून या विठ्ठल मंदिरात दर्शनाला येण्यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच दिंड्या निघाल्या होत्या. या दिंड्यांमध्ये महिला भाविकांची संख्याही लक्षणीय होती. अत्यंत शिस्तबद्धतेने वारीची पथके विठ्ठल मंदिराकडे येत असतात.
पांडुरंग भेटल्याचा साक्षात्कार
आषाढी एकादशीनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरातठेवण्यात आला आहे. भाविक सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विठुरायाचे दर्शन घेऊन पांडुरंग हरी नामाच्या गजरात रंगून गेलेले दिसून आले. इथे आल्यानंतर साक्षात पांडुरंग भेटल्याचा साक्षात्कार होतो अशी प्रतिक्रिया इथे आलेल्या भाविकांनी दिली. तर प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारे हे विठ्ठलाचे मंदिर म्हणजे पंढरपूरच आहे, असेही भाविक म्हणाले. काल सायंकाळी ८ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली असून आज रात्री १२ पर्यंत दर्शन सुरू राहणार आहे.
हेही वाचा -
- पांडूरंगानंच दिलं, त्याच्या चरणी अर्पण करू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पांडूरंगापुढं केलेलं 'अनकट' भाषण - Ashadhi Wari 2024
- आषाढी एकादशी 2024; पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी - Ashadhi Ekadashi 2024
- आषाढी एकादशी 2024; महाराष्ट्रीयन स्टाईल उपवासाच्या पाच रेसिपी, खास तुमच्यासाठी - Ashadhi Ekadashi Recipes