नवी दिल्ली Amul Milk Price Increased : लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल शक्तीच्या दरामध्ये ही वाढ झाली आहे. अमूलनं दूधाच्या दरातील वाढ ही केवळ एका राज्यासाठी नाहीतर संपूर्ण देशभरात केली आहे. त्यामुळं अमूलच्या या वाढीव दराचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
अमूलनं निवेदनात काय म्हटलंय? : अमूलनं म्हटलंय की, प्रति लिटर 2 रुपयांच्या वाढीमुळं एमआरपीमध्ये 3-4 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच कमी आहे. अमूल ताजा दुधाच्या एक लिटरच्या पाऊचची किंमत 54 रुपये आणि अमूल गोल्डची किंमत 66 रुपये इतकी होती. आजपासून दरवाढीसह, नवीन दर अनुक्रमे 56 रुपये आणि 68 रुपये असतील. तर अमूल ताजाच्या लहान पॅकेटच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय.
...त्यामुळं करण्यात आली दुधाच्या दरात वाढ : अमूलच्या सभासद संघटनांनीही मागील वर्षभरात शेतकऱ्यांच्या किमतीत सुमारे 6-8 टक्क्यांनी वाढ केली आहे. एका धोरणांतर्गत, अमूल ग्राहकांकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी देय असलेल्या प्रत्येक रुपयाचे अंदाजे 80 पैसे दूध उत्पादकांना देते. दर सुधारणेमुळे आमच्या दूध उत्पादकांसाठी दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल. त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल, असंही अमूलनं आपल्या निवेदनात म्हटलंय.
आजपासून टोलच्या दरात 5 टक्के वाढ : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) देशभरातील टोलमध्ये सरासरी 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना आजपासून खिशाला अधिक झळ सोसावी लागणार आहे. 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढणार होते. मात्र, ही दरवाढ लोकसभा निवडणुकीमुळे पुढं ढकलली होती. टोल शुल्कातील बदल हा घाऊक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीच्या बदलांशी निगडीत आहे. त्यानुसार टोलच्या दरात बदल करण्यात येतात. देशभरात सुमारे 855 टोलनाके आहेत.
हेही वाचा -