कोल्हापूर Gokul Annual General Meeting : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या म्हणजेच गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेत्या शौमिका महाडिक सभेच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशावरून पोलिसांसोबत जोरदार वादावादी झाली. यावेळी महाडिक समर्थक आणि सत्ताधारी समर्थक आमनेसामने आल्यानं मोठा गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या गोंधळातच गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न : "कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. गोकुळ दूध संघावर सत्ता असलेल्या नेत्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आमचा विरोध आहे. या सोबतच उत्पादकांकडून दररोज किमान 50 लीटर ही अट रद्द करण्यास विरोध आहे. संस्था वाढवल्या पण त्याप्रमाणे दूध संकलन वाढलं नाही. ही अट रद्द करून तुम्ही बोगस मतदार तयार करत आहात," असा आरोप करत शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
50 लिटर दुधाची अट रद्द केली जाणार : "50 लिटर दुधाची अट रद्द केली जाणार आहे. दूध संघ मल्टीस्टेटचा निर्णय घेणाऱ्यांनी आमच्यावर खासगीकरणाचा आरोप करू नये. गोकुळ दूध संघाच्या सभासदांनी तुम्हाला व्यासपीठावर बसून प्रश्न विचारण्याची संधी दिली आहे. मात्र, तुम्ही व्यासपीठाच्या समोरून प्रश्न विचारता यामुळं तुमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी आहे, असं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितलं. "सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
संघाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करू नये : दरन्यान, गोकुळ दूध संघातील सत्ताधारी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "पशुवैद्यकीय महाविद्यालय शासनाकडून बांधण्यात येणार. महाविद्यालय कुणालाही खासगी स्वरूपात चालवू न देण्याचा ठराव गोकुळ कडून करण्यात आलाय. संघाला बदनाम करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नयेत," असं आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं.
महाडिक यांचा टीआरपीसाठी खटाटोप : सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवायचं काम सुरू असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. "शौमिका महाडिक केवळ टीआरपीसाठी गोंधळ घालत आहेत. गोकुळच्या सभासदांचं दुःख त्यांना नाही, गोकुळ मधील त्यांचे टँकर बंद झाले हे त्यांचं दुःख आहे. या दुःखापोटीच त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. सभासदांच्या हितासाठीच गोकुळचा कारभार सुरू आहे, असं आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा
- पंतप्रधान मोदींचा पालघर दौरा; आंदोलन करत काँग्रेसकडून निषेध, वर्षा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात - Congress Protest PM Visit Palghar
- रस्त्यावर मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला मायलेकींनी दिला चोप; पाहा व्हिडिओ - Nashik News
- मुंबईत पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू - Mumbai Hit and Run