मुंबई Salman house firing : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील भुज येथून सागर पाल, विकी गुप्ता यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एका मंदिरातून अटक केली. मात्र, या दोघांना मदत करणारे, विशेषत: त्यांना शस्त्रे पुरवणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर सागर पाल याला पिस्तूल पुरवण्यात आली होती. 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे परिसरातून आरोपींना पिस्तूल पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 14 एप्रिलच्या पहाटे दोन शूटर्सनी सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केला होता.
आरोपींना 4 लाखांची सुपारी : मात्र, आरोपींना पिस्तूल पुरविणारी व्यक्ती कोण होती, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. सागर पाल, विकी गुप्ता या दोघांना पैसे देणाऱ्या व्यक्तीचीही पोलीस चौकशी करत आहेत. या दोन्ही आरोपींना 4 लाखांची सुपारी मिळाली असून सुरुवातीला त्यांना 1 लाख रुपये देण्यात आले होते. उर्वरित तीन लाखांची रक्कम कामानंतर देण्याचं ठरलं होतं. सागर पाल हा आठवी उत्तीर्ण असून विकी गुप्ता हा दहावी उत्तीर्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
चार पथकं आरोपीच्या शोधात : तसंच गुन्हे शाखेची चार पथकं आरोपीच्या शोधासाठी राज्याबाहेर पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बिहार, राजस्थान, गुजरात, दिल्लीत पोलिसांची पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणी तक्रारदार हा सलमान खानचा अंगरक्षक शन्मुगाबालन स्वामी देवेंद्र (वय ३९) आहे. शनिवारी अंगरक्षक शन्मुगाबालन स्वामी देवेंद्र आणि बिपीन गुप्ता हे सेकंड शिफ्टला सलमानच्या घरावर आले होते. त्यानंतर सिक्युरिटी केबिनमध्ये हे दोघे बसले होते. त्यांना पहाटे पाच वाजेच्या सुमारास फटाक्यासारखा आवाज ऐकू आल्यानं त्यांनी बाहेर येऊन पहिलं. तेव्हा दोन्ही आरोपी बाईकवरून मेहबूब स्टुडिओकडे जात होते. त्याठिकाणी उभा असलेल्या रिक्षा चालकानं घडलेला सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
हे वाचलंत का :
- दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing
- सलमानच्या जीवावर उठलेल्यांना सलीम खाननी म्हटलं 'जाहिल लोग', मुंबई पोलिसांचं केलं कौतुक!! - Salman Khan
- बिहारहून होळी साजरी करुन आले अन् सलमानच्या घरावर केला गोळीबार; गोळीबार प्रकरणाची 'Inside Story' - Salman Khan