मुंबई : मुंबईत सध्या सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. त्यातच मेट्रोची कामं आणि इतर कामं सुरू असल्यानं विविध ठिकाणी बॅरिकेट्स लावून ठेवण्यात आलेत. मागील काही वर्षांपासून या सगळ्यांचा त्रास मुंबईकरांना होतोय. यातच भर म्हणजे एखादा रस्ता व्यवस्थित झाला की विजेच्या लाईनसाठी, इंटरनेटच्या लाईनसाठी किंवा अन्य कामांसाठी तो रस्ता पुन्हा खोदला जातो. मात्र, आता यावर मुंबई महापालिकेनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एकदा पूर्ण झालेला रस्ता खोदायचा असल्यास पालिकेशी संबंधित कोणत्याही विभागानं याला परवानगी देऊ नये, असे आदेश आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले.
आयुक्तांनी आदेशात काय म्हटलंय? : सध्या मुंबईत जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांखालून विविध वाहिन्या जात आहेत. यामध्ये मलनिस्सारण, इंटरनेट कंपन्या, जल वाहिन्या, वीज वाहिन्या, दूरध्वनी वाहिन्या अशा विविध वाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळं एखाद्या रस्त्याचं काम सुरू असतानाच या सर्व संबंधित विभागांनी योग्य समन्वय राखून काम करावं. तसंच एकदा का रस्ता पूर्ण झाला की, त्या रस्त्यावर पुन्हा चर खणण्यास किंवा खोदकाम करण्यास कोणत्याही विभागानं परवानगी देऊ नये, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेत.
दबावाला बळी न पडता परवानगी नाकारली जाईल : महानगरपालिकेच्या सर्व 24 वॉर्डमध्ये पावसाळ्यानंतर करायण्यात येणाऱ्या विविध कामांचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) आढावा घेतला. पालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरात रस्ते काँक्रिटीकरणाची आणि सोबत उपयोगिता वाहिन्यांची म्हणजेच गॅस पाईपलाईन, इंटरनेट सेवा, विद्युत वाहिन्यांचीदेखील कामं सुरू आहेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता विभाग, मलनिस्सारण विभागांसह वीज कंपन्या, इंटरनेट कंपन्या, दूरध्वनी कंपन्यांसमवेत समन्वय साधनाच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. पूर्ण झालेल्या रस्ता पुन्हा खोदण्यासाठी परवानगी मागण्यास कोणी आलं तर कोणत्याही दबावाला न जुमानता परवानगी नाकारली जाईल. रस्ते विभागातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपस्थित राहून जागरूक राहिलं पाहिजे, असंही गगरानी म्हणाले. दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानंतर तरी रस्ते बांधून पूर्ण झाल्यावर पुन्हा विविध कामांसाठी तिथं खोदणं, असे प्रकार आता यापुढं मुंबईत थांबतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा -
- ऐतिहासिक बाणगंगा तलावातील गाळ उपशासाठी मुंबई महापालिका सोडणार 'जेलीफिश' - Historical Banganga Lake
- बृहन्मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोडवर! रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची होणार तपासणी - Mumbai Street Food inspection
- मुंबईकरांनो सावधान : साचलेल्या पाण्यातून चालताना काळजी घ्या, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ - Leptospirosis Infection In Mumbai