सातारा Grain Distribution Stopped : दुष्काळी असलेल्या माण तालुक्यात ई-पॉस मशीनमध्ये (E Pos Machine) सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळं रेशन कार्डधारकांना धान्य वितरण करताना अडचणी येत आहेत.
तहसील कार्यालयात जमा केल्या ई-पॉस मशीन : माण तालुक्यात सर्व्हरच्या समस्येमुळं रेशन कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रसंग घडतात. धान्य वितरण करता येत नसल्यानं कार्डधारकांना दुकानांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. तर माण तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवानराव गोरे (Bhagwanrao Gore) यांच्या नेतृत्वाखाली, 139 स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवारी ई-पॉस मशीन बॉक्समध्ये भरून तहसील कार्यालयात जमा केल्या. विशेष म्हणजे भगवान गोरे हे भाजपाचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे वडील आहेत. यावर शासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी, भगवानराव गोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदारांच्या वडिलांनी केल्या 'या' मागण्या : माण तालुक्यात जुलै महिन्यातील धान्याचे 70 टक्के वाटप झालेले नाही. जुलैमधील धान्य वाटपाची मुदत ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील धान्य वाटप एकाच पावतीवर काढलं जावं. गोडाऊनमधून दुकानदारांकडं येणारी धान्याची पोती फाटकी असतात. त्यामुळं वाहतुकीवेळी आणि धान्य वितरणावेळी धान्य खाली सांडते. यामुळं दुकानदारांना प्रत्येक पन्नास किलोच्या पोत्यामागे 500 ग्रॅम तुट घालण्यास परवानगी मिळावी, अशा मागण्या भगवानराव गोरे यांनी निवेदनात केल्या आहेत.
ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची सोय नाही : राज्यातील शिधा वाटप केंद्रांवरील धान्य वितरण गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यामुळं वितरण प्रणालीतील सर्व्हरच्या बिघाडाचा फटका लाभार्थ्यांना बसत आहे. ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची सोय उपलब्ध नसल्यानं, शिधापत्रिका धारकांना धान्य वितरण बंद झाले आहे.
दुकानात आहेत जुन्या मशीन : दुकानात असलेल्याई पॉस मशीन केव्हाही बंद पडते. कारण त्या वेळोवेळी अपडेट होत नाही. त्याना ऑनलाईन सपोर्ट करणारी कोणतीही व्यवस्था नाही. सरकारने त्यांना मदत करण्याचं ठरवलं होतं परंतु, या संदर्भातले काही परिपत्रक शासनाने काढलेले आहेत. या परिपत्रकाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे.
हेही वाचा -