नागपूर G N Saibaba Nagpur PC : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे गेली १० वर्ष कारागृहात घालवल्यानंतर आज (7 मार्च) दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा (गोकरकोंडा नागा उर्फ साईबाबा) यांची कारागृहातून सुटका झाली आहे. त्यांच्या वकिलांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत साईबाबांनी धक्कादायक खुलासा केला आहे. २०१४ मध्ये काय परिस्थिती होती, कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी आदिवासींवर अन्याय होत असल्याचा दावा करत काम करायला सुरुवात केली होती, याचा खुलासाही केला आहे.
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न : "२०१४ला छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली 'सलवा जुडुम' आणि 'ऑपरेशन ग्रीन हंट' ही मोहीम चालवली जात होती. आदिवासींवर अत्याचार करून त्यांच्या जमिनी बळकावल्या जात होत्या. लोकशाही अधिकारासाठी लढणाऱ्या दिल्लीतील काही मोठ्या व्यक्तींनी मला मानवाधिकार संघटना, सिविल सोसायटी ग्रुप्स सह आदिवासी, दलित सर्व संघटनांना एकत्रित आणण्यासाठी काम करण्याची सूचना केली. त्यामध्ये न्या. सच्चर, स्वामी अग्निवेश, सेवानिवृत्त सनदी अधिकारी व्ही डी शर्मा, सुरेंद्र मोहन, प्रोफेसर रणधीर सिंह या सर्व व्यक्तींनी देशभरातील वेगवेगळ्या संघटनांमध्ये एकोपा घडवून आणण्याचे काम मला सोपवले होते. त्या अनुषंगानं कागदोपत्री (डॉक्युमेंटेशन) करण्याचं काम मी करत होतो. लोकांचा आवाज उचलत होतो; मात्र तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारांना ते अजिबात आवडलं नाही. त्यामुळेच माझ्या विरोधात कारवाई करत सर्वांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा" आरोप प्रो. साईबाबांनी केला आहे.
मला गोवण्यात आलं, पण आता विद्यार्थ्यांना शिकवणार : "मला अडकवण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या एका प्रकरणात नव्यानं माझं नावही गोवण्यात आलं", असा आरोपही साईबाबा यांनी केला. आज तुरुंगातून सुटका होताच ते त्यांच्या वकिलाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "माझी तब्येत खूप खालवलं आहे. अनेक शस्त्रक्रियांची गरज असून वैद्यकीय उपचारांना आधी सामोरे जावं लागेल. भविष्यात आपलं काम सुरू ठेवत विद्यार्थ्यांना शिकवणार," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आता अनेक आजारांनी ग्रस्त झालोय : "माझी तब्येत खालावत आहे. मी नीट बसूसुद्धा शकत नाही. योग्य प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळाले नाही. त्यामुळे मला आरोग्याच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मी जेव्हा मे २०१४ मध्ये कारागृहात गेलो तेव्हा शारीरिक दृष्टीने सक्षम होतो. पोलिओ वगळता मला कोणतेही आजार नव्हते. मला आता खूप आजार झाले आहे. लिव्हर समस्या, पॅनक्रिया समस्या आहेत. डॉक्टरने जाहीर केलं आहे की, मला अनेक ऑपरेशन करावे लागेल. माझं हृदय ५५ टक्के काम करत असल्याचं डॉक्टरांनी
सांगितलं आहे. माझी तब्येत फार चांगली नाही असं जाहीर केल्यानंतर देखील मला ऍक्टिव्ह मेडिकल उपचार मिळाले नाहीत; पण आज मी बाहेर आलो आहे. याकरिता मी सर्व वकिलांना धन्यवाद देतो. न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे", असं प्रोफेसर साईबाबा म्हणाले.
म्हणून सुरेंद्र गाडगीळवर कारवाई : "माझे वकील सुरेंद्र गाडगीळ हे सक्षमपणे माझी केस लढवत होते. त्यामुळेचं त्यांना अटक झाली. ते केवळ माझा बचाव करण्यासाठी तसेच हजारो आदिवासी लोकांसाठी लढत होते. केस दरम्यान त्यांना धमक्या येत होत्या. ते साईबाबा नंतर त्यांना बघून घेण्याची भाषा करत होते. सुरेंद्र गाडगीळ माझे वकील 'ह्युमन फेस ऑफ लॉ' आहेत", असं देखील ते म्हणाले आहेत.
दहा वर्षे न्यायाची प्रतीक्षा : "माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसताना मला दोषी ठरवण्यात आलं. संपूर्ण दहा वर्षे हे माझ्या जीवनातील वाया गेले आहेत. ज्यावेळी मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये उंची गाठत होतो. मला निर्दयीपणे यातना देण्यात आल्या. अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं. मी ९० टक्के शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यानं बाथरूमला जाता येत नव्हतं. दहा वर्ष माझ्या कुटुंबानं खूप सहन केलं आहे, दहा वर्षे न्यायाची प्रतीक्षा करावी लागली", असं मत साईबाबांनी पत्रकार परिषदेत मांडलं.
हेही वाचा: