पुणे : Congress West Maharashtra Division meeting : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं आंदोलन अधिक तीव्र करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा आंदोलनाच्या बाबतीत जरांगे हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, "हे सरकारचं पाप आहे. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधात होते तेव्हा ते म्हणायचे की सरकारला आरक्षण द्यायचं नाही. पण आता तर त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. तुम्ही का आरक्षण देत नाही." असा प्रश्न उपस्थित केलाय. जरांगे पाटील यांचं आंदोलन जर मुंबईपर्यंत पोहोचलं तर या राज्याची काय परिस्थिती होईल. मणिपूर मध्ये जशी परिस्थिती केली तशी राज्यात करायची आहे का? असा थेट प्रश्न पटोले यांनी विचारलाय. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे. येऱ्या- गबाळ्याचं नाही असंही पटोले म्हणालेत. पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या सरकारला आरक्षण द्यायचं नाही : आरक्षणाच प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे असंही पटोले यावेळी म्हणाले. आज जनगणना केली जात नाही. हे मुद्दाम जनगणना करत नाहीत. सरकारला गरिबांचं काहीच पडलं नाही. काल राम मंदिर सोहळ्याला देखील सगळे श्रीमंत लोक होते. राम तर गरिबांचा होता. हे लोकांना येडं समजतात. पण खर तर हेच येड्याचं सरकार आहे असं म्हणत सरकार मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय.
गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात : प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की,"शिवाजी महाराजांबद्दल इतिहासात सातत्याने छेडछाड केली जात आहे. अनेकदा आपल्या राजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊच शकत नाही." तसंच, राज्यातले सगळे उद्योग हे गुजरातला घेऊन पळाले आहेत. अनेक उद्योगपती आपल्या राज्यात मोठे झाले आणि आता सांगतात की मी गुजराती आहे. पण व्यापार करण्यासाठी त्यांना मुंबईत यावच लागेल. पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत. पण, ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखं वागत आहात, अशी थेट टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रातून कुठून उभे राहिले तरी ते निवडून येतील : काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक आज पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले सर्व महत्त्वाचे नेते, पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये उपस्थित होते. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातून इच्छुक आहेत असं समजतं. तसंच, ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? असं विचारलं असता मंचावर उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी चक्क हात जोडले. यावर उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी चव्हाण महाराष्ट्रातून कुठून उभे राहिले तरी ते निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा :
1 मराठा आरक्षण क्युरेटीव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
2 मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट
3 मराठा आरक्षण क्युरेटीव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी