सातारा Ladki Bahin scheme in Satara - साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', या योजने संदर्भात गुरुवारी मोठा निर्णय घेतला. शासकीय कार्यालयात होणारी लूट आणि फरफट थांबण्यासाठी घरोघरी शासकीय कर्मचारी पाठवून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. साताऱ्यात राबवला जाणार हा राज्यातला एकमेव उपक्रम आहे.
महिलांची आर्थिक लूट आणि फरफट थांबणार - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी उसळली. तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत पाय ठेवायला जागा उरली नव्हती. तलाठी कार्यालयातही तेच चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांकडून महिलांची अर्थिक लूट सुरू झाली होती. पैसे उकळतानाचे व्हिडिओ समोर आले.
शासकीय कर्मचारी घरी येऊन नोंदी घेणार - शासकीय कार्यालयातील वास्तव लक्षात घेवून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गुरुवारी सर्व विभागांच्या बैठका घेतल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुपरवायझर, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट अध्यक्ष, अशी समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. प्रत्येकाला कुटुंबे वाटून दिली जातील आणि कुटुंबांच्या नोंदी घेण्याची जबाबदारी त्यांची असेल.
उत्पन्नाचा दाखला सुद्धा घरपोच मिळणार - शासकीय पथकातील कर्मचारी घरी जावून तुमची कागदपत्रे तपासतील. महिलांच्या मोबाईल त्यांचे रजिस्ट्रेशन करून देतील. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ॲप स्वतः देखील रजिस्ट्रेशन करू शकतात. महिलांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नसेल त्यांचे रजिस्ट्रेशन शासकीय कर्मचारी आपल्या मोबाईलवर करून देणार आहेत. उत्पन्नाचा दाखल नसल्यास तलाठी स्वतः त्यांचा अर्ज घेवून सात दिवसात उत्पन्नाचा दाखल उपलब्ध करून देतील. कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही, असं नियोजन केल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..
- तलाठ्याची ग्रामस्थांसोबत अरेरावीची भाषा, माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीदरम्यान घडला प्रकार - Talathi argued with villagers
- शिर्डी नगरपरिषद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांची लूट; रहिवासी दाखल्यासाठी 50 रुपयांची मागणी - Mukhyamantri Ladki Bahin Yojana
- चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana