ठाणे Little Girl Death Case : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बडोदा-जेएनपीटी महामार्गाचे कल्याण तालुक्यातील टिटवाळ्या नजीक बल्याणी भागात महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या पाच ते सहा फुटाच्या जलमय खड्ड्यात पडून एका तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रहमुनिसा रियाझ शेख असे खड्ड्यात पडून मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे.
खेळताना खड्ड्यात पडून मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील बल्याणी गावात शेख पीर वल्ली शाह बाबाचा दर्गा असून या दर्गा परिसरात मंगळवारपासून उरूस सुरू आहे. याठिकाणी संदल निघतो. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी भक्त येत असतात. असेच दर्शनासाठी मीरा भाईंदर येथील मृतक बालिकेचे वडील रियाझ शेख आपल्या कुटुंबीयांसह आले होते. पीर बाबाच्या दर्शनानंतर शेख कुटुंब टिटवाळ्यात नातेवाईकांकडे गुरुवारी २९ फेब्रुवारी रोजी आले होते. त्यावेळी घरात उरूसाचा आनंद होता. त्यातच गुरुवारी दुपारच्या वेळेत मृतक रहमुनिसा घराबाहेर खेळताना जवळच महामार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्याजवळ गेली. खेळताना तिचा तोल जाऊन ती सहा फूट जलमय खड्ड्यात पडली. रहमुनिसा कोठे दिसत नाही म्हणून कुटुंबीयांनी घर परिसरात तिचा शोध घेतला. खड्ड्यात एक बालिका पाण्यावर तरंगत असल्याचं काही रहिवाशांना दिसलं. ती रहमुनिसा असल्याचं आढळलं.
कंपनीविरुद्ध नागरिकांमध्ये संतापाची लाट : कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा बडोदा-जेएनपीटी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर भादंवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली. तसंच गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून या गुन्ह्यात आतापर्यंत कोणालाही अटक केली नसल्याचं सांगितलं. मात्र, या दुदैर्वी घटनेमुळे पुन्हा एकदा या महामार्गाचा ठेका घेणाऱ्या कंपनीचा हलगर्जीपणा समोर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही घडल्या आहेत दुर्घटना : याच महामार्गालगत अशाच प्रकारच्या खड्ड्यात काही महिन्यांपूर्वी एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर चार बालके याच खड्ड्यात पडून यापूर्वी जखमी झाली होती. या महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खड्ड्यांभोवती अडथळे उभे करा असं सांगूनही ते ऐकत नाहीत, अशी तक्रार रहिवासी झीनत कुरेशी यांनी केली. माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडल्याचं सांगितलं.
हेही वाचा: