पुणे Transgenders Dhol Tasha Pathak - पुणे शहर हे 'विद्येचं माहेरघर' असून पुणे शहराला महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'देखील म्हटलं जातं. पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून नागरिक पुण्यात येत असतात. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली आहे. यंदा गणेशोत्सवाच्या आगमनाच्या आणि विसर्जन मिरवणुकीत राज्यातील पहिलं तृतीयपंथीय ढोल ताशा पथक आपल्याला ढोल ताशा वाजवताना पाहायला मिळणार आहे.
पुणे शहरात साधारणत: दोनशेहून अधिक ढोल ताशा पथक आहेत. गणेशोत्सवासाठी ढोल ताशा पथकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. अशातच पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात प्रथमच तृतीयपंथीयांनी एकत्र येत राज्यातील पहिलं ढोल ताशा पथक तयार केलं आहे. या पथकातील तृतीयपंथीयांनी स्वतः ढोल तसेच ताशा वाजवायला शिकून तयारी सुरू केली. त्यांच्या या राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय ढोल ताशा पथकाला 'शिखंडी' ढोल ताशा पथक नाव देण्यात आलं आहे. हे पथक यंदाच्या गणेशोत्सवात सुपारी घेऊन वादनाला तयार झालं आहे.
आमच्या पथकात 25 ते 30 जणी- याबाबत या पथकाचे सदस्य प्रेरणा यांनी सांगितलं," आज विविध क्षेत्रात तृतीयपंथीय हे काम करत आहेत. गणेशोत्सव हे पुण्याचं वैभव तसेच पुण्याची संस्कृती आहे. याच गणेशोत्सवात आम्हाला ढोल ताशाचे वादन करायचे होते. आपल्याला तर कोणीही पथकात घेणार नाही. पण जर आपण पथक सुरू केलं तर आपण शिकू शकतो. ही आमच्या डोक्यात कल्पना आली. त्यामुळे बाप्पाच्या समोर ढोल ताशा वादनही करू शकतो. हीच बाब लक्षात घेत सुरवातीला आम्ही तीन जण पुढे आलो. आज पाहता-पाहता आमच्या पथकात 25 ते 30 जणी आहोत. जे आत्ता पूर्णपणे ढोल तसेच ताशादेखील वाजवू शकतात."
वादन करायला मिळावं- "आम्ही साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ढोल ताशा वादनाला सुरवात केली. आम्हाला हे वादन नादब्रह्म ढोल ताशा पथकातील प्रमुखांनी शिकवलं. आम्ही ते शिकत गेलो. आम्ही यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवसाच्या तसेच सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत वादन करणार आहोत. आमची इच्छा आहे की, आम्हाला मानाचे पाच गणेशोत्सव मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाचे वादन करायला मिळावं," असंदेखील या पथकातील वादक मन्नत हिनं सांगितलं आहे.
- शिखंडी ढोल ताशा पथक पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात सराव करत आहे. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. याच उद्दिष्टानं हे पथक पुण्यात वादनाचा सराव करत आहे. आज या पथकात जरी 20 ते 25 वादक असले तरी पुढील वर्षी त्यांना पथक मोठं करायचं आहे. पुण्यातील विविध मंडळाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत वादन करण्याची शिखंडी ढोल ताशा पथकातील सदस्यांची इच्छा आहे.
हेही वाचा-