गडचिरोली Gadchiroli Naxalites News: माओवाद्यांचा बालेकिल्ला अलेल्या भामरागड तालुक्यातील ७ गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ जून रोजी धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये परायणार, तेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली आणि महाकापाडी या गावातील नागरिकांनी एकत्रिपणे येऊन सर्वानुमते नक्षल गावबंदी करण्याचा ठराव धोडराज पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला.
ही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचं वर्चस्व समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ आहेत. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग असलेल्या या भागात नक्षल्यांनी मोठमोठ्या हिंसक घटना घडविल्यात. गावातील काही सदस्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या.
उडान अंतर्गत विविध जनजागरण : गडचिरोली पोलीस दलानं दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 'प्रोजेक्ट उडान' अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य शिबिर, महिला मेळावे आदींच्या मार्फत गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवल्या. दोडराज पोलिसांनी ग्राम भेटी देऊन पोलीस आणि नागरिकांमध्ये असलेला दुरावा दूर केला. त्यामुळे गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला. त्यामुळे गावातील नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे.
मागील ४० वर्षांपासून परिसर नक्षलांच्या त्रासात: मागील ४० वर्षांपासून हा परिसर नक्षलींच्या त्रासाने धगधगत होता. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून अनेक निष्पाप गावकऱ्यांची नक्षवाद्यांनी हत्या आणि मारहाण केली जायची. या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. लक्षल्यांनी या तालुक्यात अनेक मोठमोठ्या हिंसक घटना घडवल्या आहेत. यामुळे त्रस्त नागरिकांनी नक्षल गावबंदी योजनेचा फायदा घेतला.
बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी: गावकऱ्यांमध्ये हा बदल घडवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी(भामरागड) अमर मोहिते आणि धोडराज पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाऱ्या सात गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक नीलोप्तल यांनी अभिनंदक करत गडचिरोली जिल्ह्यास नक्षलमुक्त करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं.
हेही वाचा