अमरावती Uddhav Thackeray Birthday : राज्य शासनाच्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांमध्ये महिलांना जिल्हा बँकेत मोफत खातं उघडून देण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी लाडक्या बहिणींना विशेष गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. 21 ते 27 जुलै दरम्यान राबवल्या जाणाऱ्या खास उपक्रमांतर्गत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर ठाकरे यांनी कायमच शिंदेंविरोधात कडक शब्दात टीका केली. शिंदे सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांचा विरोध खुद्द उद्धव ठाकरेंनी केला. मात्र, शिंदे सरकारनं सुरू केलेल्या 'माझी लाडकी बहीण' योजनेला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न पडला. कारण या योजनेसाठी अमरावती शिवसेनेकडून महिलांना बँक खाती उघडून दिली जाणार आहेत आणि तेही उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं.
बँकेच्या उपाध्यक्षांनी केलं जाहीर : 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं 21 जुलैपासून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याबाबत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. विविध उपक्रमांतर्गतच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीनही तालुक्यांमध्ये जिल्हा बँकेच्या सर्व शाखेत महिलांना मोफत खातं उघडून देण्यात येणार आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं 'मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण' योजनेसाठी शंभर रुपयात बँक खातं उघडून दिलं जातं.
आठवडाभर विविध उपक्रम : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 21 जुलै ते 27 जुलै दरम्यान संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महिला बचत गट, वस्तू प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसंच गुरु पौर्णिमेच्या दिवशी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये (उबाठा) प्रवेश करतील, असं अभिजीत ढेपे म्हणाले.
शिवसेनेशी गद्दारी परवडणारी नाही : लोकसभा निवडणुकीदरम्यान बडनेरा तसंच अमरावती तालुक्यातील शिवसेनेच्या चार पैकी तीन पदाधिकाऱ्यांना रवी राणा यांच्याकडून थार गाडी तसंच एकाला अन्य एक वाहन गिफ्ट मिळालं आहे. यापैकी काही गाड्या आता रस्त्यावर धावत असून या संदर्भात शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित झाला. या प्रश्नावर शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी शिवसेनेसोबत आजपर्यंत गद्दारी करणाऱ्या एकाचंही भलं झालं नाही. शिवसेनेसोबत गद्दारी परवडणारी नाही एवढंच उत्तर दिलं.
'हे' वाचलंत का :