नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील बोरी गावाजवळ चार शाळकरी मुलं कालव्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. वाहून गेलेले सर्व विद्यार्थी वसतिगृहात राहत होते, अशी माहिती समोर आलीय. घटनेची माहिती समजल्यानंतर कालव्याचं पाणी अडवण्यात आलंय. अद्याप एकाही मुलाचा पत्ता लागू शकलेला नाही.
आठ विद्यार्थी पोहायला गेले होते : या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बोरी गावाजवळ इंदिरा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आज दुपारी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. आठ पैकी चार मुलं पाण्यात उतरले. मात्र, तेव्हा कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळं ते स्वतःला सावरू शकले नाही आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले.
मुलांचा शोध सुरू : चौघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून चारही मुलांचा शोध कार्य सुरू आहे. मात्र, अद्याप त्यात यश मिळालं नाही. कालव्यात बुडालेले सर्व विद्यार्थी सातवी ते अकराव्या वर्गादरम्यानचे असल्याची माहिती आहे.
तलावात बुडून 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू : दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी तलावात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. नागपूर शहरातील दिघोरी आणि खरबी परिसरातील 13 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलं झिलपी तलावाच्या परिसरात फिरायला आले होते. हे सर्व वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी असून एकाच परिसरात राहत असल्यानं त्यांची ओळख होती. विरसेन विठोबा गजभिये व गौरव लीलाधर बुरडे (वय 15 वर्षे) या दोघांचा बुडून मृत्यू झालाय. विरसेन व गौरवची पोहण्याची इच्छा झाल्यानं तलावात उतरले. इतर 5 जणांनी तलावात जाण्यापासू त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. त्यामुळं इतर सर्व तलावाच्या काठावर असलेल्या एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते. पाण्यात काही दूर गेल्यावर हे दोघेही दिसेनासे झाले. काही वेळानंतर ते दिसेनासे झाले त्यामुळं मित्रांनी आरडाओरडा सुरू केला असता त्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचं निष्पनं झालं.
हेही वाचा