मुंबई Francis Dibrito Passes Away : सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. वसईतील नंदाखाल इथं त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनानं उमदा मराठी साहित्यिक आणि विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यासह त्यांनी 'हरित वसई' ही चळवळ प्रभावीपणानं राबवली आहे.
आज दुपारी होणार अंत्यसंस्कार : फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मागील काही दिवसांपासून दिर्घ आजाराशी लढत होते. त्यांच्यावर वांद्र्यातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मायबोलीसाठी अहोरात्र आपलं कार्य सुरू ठेवलं होतं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं पार्थिव जेलाडी इथल्या त्यांच्या राहत्या घरी दुपारी 03.30 पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव नंदाखेल इथल्या चर्चमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा परिचय : फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल या गावी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बीए, तर धर्मशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सन 1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरु पदाची दीक्षा घेतली. गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची बहुआयामी ओळख निर्माण झाली. शिवाय 'सुवार्ता' या मासिकाद्वारे फादर दिब्रिटो यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक विविध विषय मांडले. त्यासाठी त्यांनी काही उपक्रमही राबवले. त्यांच्या या कार्यामुळे सुवार्ता हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मियांसाठी न राहता मराठी साहित्य विश्वातही या मासिकाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला गेला. 1983 ते 2007 या काळात फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे सुवार्ताचे मुख्य संपादक राहिले आहेत.
इस्रायलमध्ये राहून केलं संशोधन : महत्त्वाचं म्हणजे 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमी'ची हे पुस्तक लिहिण्यासाठी फादर दिब्रिटो हे इस्रायलमध्ये गेले. तिथं राहून त्यांनी यावर काही काळ संशोधनही केलं. 'सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी 2013 सालच्या साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. उस्मानाबाद इथं ( आताचं धाराशिव ) पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवलं आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संपदा :
- आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, ओअॅसिसच्या शोधात,
- नाही मी एकला (आत्मकथन),
- ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र),
- नाही संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास,
- सुबोध बायबल - नवा करार
हेही वाचा :