ठाणे Autowala Beaten Jai Shri Ram : मुंब्रा येथे पाच जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांनी या रिक्षावाल्याला 'जय श्रीराम' म्हणण्याची सक्ती केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर या पाच जणांवर डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार 15 फेब्रुवारीच्या रात्री घडला.
'जय श्रीराम' बोलण्याची सक्ती : डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री मुंब्रा येथील एका रिक्षा स्टॅंडवर घडली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास 46 वर्षीय रिक्षा चालक मोहम्मद साजिद मोहम्मद यासीन खान हे गिऱ्हाईकांची वाट पाहत उभे होते. दरम्यान, हे पाच जण तेथे आले आणि त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मारहाण करताना खान यांना जमिनीवर पाडून 'जय श्रीराम' म्हणण्याची सक्ती देखील केली.
रिक्षातील पैसे चोरून पळाले : मारहाण केल्यानंतर हे पाचही आरोपी तिथून पळून गेले. त्यानंतर खान यांनी आपली रिक्षा तपासली असता, आरोपी रिक्षातील पैसे चोरून पळाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल : हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर डायघर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. जमावानं या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या पाचही आरोपींवर कलम 395 (चोरी), कलम 295 अ (धार्मिक भावना भडकवणे) आणि कलम 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे वाचलंत का :