मुंबई Devendra Fadnavis on CIBIL Score : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला होता. त्यामुळं आता सरकारनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मंगळवारी मुंबईत दोन बैठका झाल्या. यामध्ये एक राज्यस्तरीय बँकर लोकांची बैठक होती. तर दुसरी पूर्व हंगाम बैठक होती. या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाली असून, सीबील स्कोरच्या नावावर शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर आता एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये, असंही फडणवीस म्हणाले.
सीबील स्कोर प्रकरणी फडणवीस आक्रमक : "बैठकीमध्ये रिझर्व बँकेच्या प्रतिनिधी व स्टेट बँक कमिटीच्या सदस्यांना सांगितलं आहे की प्रत्येकवेळी तुम्ही बैठकीमध्ये सांगता की शेतकऱ्यांवर सीबीलची अट लागू करणार नाही. परंतु, सीबीलचं कारण देऊन तुम्ही त्यांना कर्ज नाकारता हे यापुढं खपवून घेतलं जाणार नाही," असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिला. "जे तुम्ही इथं बैठकीत सांगता तसंच बँकांनी त्यांचं पालन केलं पाहिजे. अशा प्रकारे सीबीलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू. हे सर्व तुम्ही तुमच्या बँक शाखांना कळवा," असा समजही फडणवीस यांनी यावेळी दिला.
विरोधकांनी पुण्याच्या प्रकरणावर राजकारण करू नये : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन केलंय. "विरोधकांची सत्ता असताना त्यांनी काहीच केलं नाही. महाविकास आघाडीची सत्ता असताना पोलीस विभागाचे धिंडवडे निघाले. शंभर, शंभर कोटी रुपयांची वसुली कशी झाली ते सर्वांनी पाहिलेलं आहे. आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरेन्सची आहे. केंद्र सरकारची मदत भेटत आहे. सर्व राज्य सरकार एकत्रित काम करत आहेत म्हणून या ठिकाणी हे सर्व बाहेर येत आहे. राज्य सरकार पूर्ण क्षमतेनिशी कारवाई करत आहे. जो पण याच्यामध्ये पोलिसवाला, हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अतिशय कडक कारवाई असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी याचं राजकारण करू नये. राजकारण करायचं असेल तर त्यांच्या अडीच वर्षात काय घडलं याची प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. त्यांच्या काळात काय, काय होत होतं हे सर्वसुद्धा मला सांगावे लागेल. परंतु माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा असून, आमच्या पुढील पिढीच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतली आहे, त्याचं स्वागत झालं पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले.
नॅनो युरियाचा वापर वाढवण्यावर भर : शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी ज्या अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. खरीप पूर्व जी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत बियाणांची, खतांची उपलब्धता करणं यावर्षी आमचा प्रयत्न असणार आहे. यंदा नॅनो युरियाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला पाहिजे, असे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना पूर्णपणे पिक विमा मिळाला पाहिजे, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.
हेही वाचा -