मुंबई : कुर्ल्यातील एलबीएस रोडवर बेस्ट बसनं चिरडल्यानं 6 जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तब्बल 49 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातामुळे कुर्ल्यातील एलबीएस रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली. अपघातप्रकरणी बसच्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. शिवम कश्यप (18), कनिझ फातिमा (55), अफील शाह (19) आणि अनाम शेख (20) अशी या अपघातात मृत झालेल्या नागरिकांची नावं आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर संजय मोरे असं चालकाचं नाव असल्याचंही या सूत्रांनी सांगितलं.
बेस्ट बसनं चिरडल्यानं 6 ठार : बेस्टची 332 क्रमांकाची बस कुर्ला स्थानकातून निघून अंधेरीला जात होती. कुर्ल्याहून निघालेल्या बसने अचानक वेग घेतला आणि रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना, रस्त्यातील वाहनांना चिरडून ही बस वेगाने पुढे सरकत होती. अखेर एका सोसायटीच्या भिंतीला धडकून बस थांबली. या संपूर्ण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्याला सुरुवात झाली.
बस चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात : कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्टचा भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसनं रस्त्यावर चालणाऱ्या 25 जणांना चिरडलं अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, जखमींना सायन आणि कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे. बेस्ट बस रूट क्रमांक 332 कुर्ला स्थानक येथून ही बस अंधेरीकडं जात असताना हा भीषण अपघात घडला.
पहिल्यांदाच अवजड बस काढली रोडवर अन् चिरडलं नागरिकांना : या अपघाता वेळी सदर बसमधून तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताबाबत कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी बस चालक संजय मोरे यानं मद्यपान केलं नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. हा अपघात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं घडला. आरोपी बस चालक संजय मोरे एक डिसेंबर रोजी बेस्ट बस चालक म्हणून रुजू झाला. संजय मोरे कंत्राटी कामगार असून, त्याला अवजड वाहन चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. संजय मोरे यानं आतापर्यंत केवळ छोटी वाहनं चालवली आहेत. सोमवारी 10 डिसेंबर रोजी संजय मोरेनं पहिल्यांदाच बस मुख्य रस्त्यावर चालवायला घेतली. त्याचवेळी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला."
चार पोलिसांनाही चिरडल्यानं मोठी खळबळ : या अपघातात सदर बस चालकानं चार पोलिसांना देखील चिडलं असून, या पोलिसांवर सेवेन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चारही पोलिसांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांच्यावर डॉक्टर सभ्यता यांच्या देखरेखी खाली पुढील उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
चालकावर गुन्हा दाखल : अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून बचावकार्य करण्यात आलं. या विभागाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळावर तत्काळ बचावकार्य सुरू केल्याची माहिती आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरू होती. बस चालकानं मद्यपान केलं होतं, की नाही, याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही. त्याबाबतचा तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.
हेही वाचा :