नाशिक Sexual Assault Of Minor Girl : नाशिक इथं बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. नराधम पित्यानं आठवीमध्ये शिकणाऱ्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईला मोबाईलमध्ये नवऱ्याचा आणि मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दिसल्यानं या घटनेला वाचा फुटली. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईनं आपल्या पतीविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली.
आजारी असल्यानं पीडित घरी एकटीच होती : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरात राहणारी पीडित 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी आजारी होती. त्यामळं ती 25 एप्रिल 2024 रोजी शाळेत गेली नव्हती. यावेळी तिची आई आणि आजी या दोघी काम करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तर आजोबा आणि काका हे हॉस्पिटलमध्ये गेले होते. तसंच पीडित मुलीचा भाऊ हा शाळेत गेला होता. त्यामुळं पीडित अल्पवयीन मुलगी आणि दारूच्या नशेत असलेला बापच घरात होते.
व्हिडिओ आईला दाखवण्याची दिली धमकी : सकाळी दहा वाजेच्या सुमारास पीडितेच्या नराधम बापानं जेवण करून घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घेतल्या. त्यानंतर तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला. हा नराधम इतक्यावरच थांबला नाही. त्यानं मोबाईलमध्ये या सर्व विकृतीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला. व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेन, अशी धमकी देत त्यानं पुन्हा अत्याचार केला. तसंच ही घटना कोणाला सांगितल्यास तुला मारून टाकेन आणि व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेन, अशी धमकी दिली. यामुळं घाबरलेल्या पीडितेनं ही घटना घरातील कोणालाच सांगितली नाही.
मोबाईलमुळं घटना आली समोर : दरम्यान, पीडित मुलीच्या आईने पतीचा मोबाईल घेऊन त्यातील एक ॲप ओपन केलं असता तिला त्यामध्ये आपल्या पतीचा आणि मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दिसला. हे बघून तिला धक्का बसला. याबाबत पीडित मुलीला धीर देत तिच्याकडं विचारपूस केली असता पीडित मुलीनं घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. या घटनेनं हादरून गेलेल्या आईनं या प्रकाराला पाठीशी न घालता थेट म्हसरूळ पोलीस ठाणे गाठलं आणि नराधम पतीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच नराधम बाप फरार झाला. मात्र, पोलिसांनी सापळा रचून त्याला म्हसरूळ परिसरातून अटक केली. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
हेही वाचा
- माणूस की हैवान? मुलानं जन्मदात्या आईवरच केला बलात्कार - son raped her mother
- अग्निवीर जवानाचा मित्रांसह अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी उत्तराखंडमधून ठोकल्या बेड्या - Agniveer Soldier Gangraped A Girl
- खिचडी देण्याच्या बहाण्यानं दिव्यांग मुलीला बोलावलं दुकानात अन्.... - Abusing Disabled Girl