पुणे Orchid Farming : भारत हा शेतीप्रधान देश असून देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आता पारंपरिक शेती बरोबर शेतीत मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून शेतात विविध प्रयोग केलेली अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. असाच एक प्रयोग करत पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील शेतकरी रामचंद्र रघुनाथ सावे यांनी आपल्या शेतात ऑर्किड फुलांची शेती करुन दाखवली आहे. शेतकरी रामचंद्र रघुनाथ सावे यांनी प्रसिध्द फूल शेती तज्ञ आणि पुण्यातील राईज अँन शाईनच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मदतीनं आपल्या नऊ एकर शेतात ऑर्किड फुलांची शेती केली असून आता या ऑर्कीड फुलांना जास्त मागणी मिळत आहे.
चार भावांनी मिळून केली शेती : कोकण म्हटलं की आपल्यासमोर येथील निसर्गसंपन्नता येते. विशेषत: तिथला समुद्र किनारा, नारळ, सुपारी,आंबे यांच्या बागा आणि तिथली सांस्कृती जपणारे वाडे हे सर्व आपल्याला प्रामुख्यानं कोकणात पाहायला मिळतात.अशा या कोकणात विविध शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करुन विविध प्रकारची शेती करत असतात. शेतकरी रामचंद्र सावे आणि त्यांचे बंधू शेतात भाजीपाल्याची शेती करत होते. पण भाजीपाल्याची शेती करत असताना जमिनीवरील तसंच अस्मानी संकटांचा अनेक वेळा त्यांना सामना करावा लागत होता. यात कधी कधी मोठं आर्थिक नुकसान देखील होत होतं. अशातच यावर मार्ग म्हणून माहिती घेत असताना त्यांना ऑर्किड फुलांच्या शेतीबाबत एकानं माहिती दिली. शेतीची आवड आणि कष्ट करण्याची तयारी असल्यानं त्यांच्या चार भावानी मिळून आज डहाणुमधील चिंचणी गावात शेती वाढविण्याचा निर्धार केला आणि ती सत्यातही उतरविली.
सध्या 9 एकरात ऑर्किड फुलांची शेती : यावेळी ऑर्किड फूल उत्पादक शेतकरी रामचंद्र सावे म्हणाले, "सुरुवातीला आम्ही भाजीपाला पिकवत होतो. ज्यात शिमला मिरची, टोमॅटोची शेती करत होतो. एकदा शेतात येत असताना नैसर्गिक ऑर्किड बघितलं आणि माझ्या मनात आलं की आपण याची शेती का करु नये. मग बेसिक नॉलेज घेऊन एक एकरमध्ये या ऑर्किड फुलाची शेती केली. त्याची वाढ बघितल्यावर दोन एकरमध्ये अजून शेती केली. हे करत असताना पैसे खूप लागत होते. जवळपास 70 लाख रुपये खर्च आला होता. पण ते एक ते दोन वर्षात भरुन निघालं. एवढ्यावरच न थांबता यात तांत्रिक मदत करणाऱ्या पुण्यातील राईज अँन शाईनच्या माध्यमातून बँकॉकला जाऊन तिथं कश्या पद्धतीनं याची शेती होते, याचा अभ्यास करुन यात वाढ करुन आता 9 एकरमध्ये याची शेती केली आहे." ऑर्किडच्या फुलांना मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून मोठी मागणी असल्यानं आता यापुढं सावे बंधुनी ही फूल शेती वाढविण्याचा निश्चय केला आहे. कोकणी माणूस इर्शेला पेटला की काय साध्य होते हे या सावे बंधुच्या ऑर्किड फूल शेतीमधून दिसून येतं.
हेही वाचा :