अमरावती Amravati Central Jail : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू फेकण्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. कारागृहात बंद असणाऱ्या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या साथीदारांनी कारागृहाच्या मागून जाणाऱ्या अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवरून बॉम्ब फोडून आनंद साजरा केल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे कारागृहामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 'हर्ष शेरेकर' आणि 'रोहित काळे' असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही अमरावती शहरातील बेनोडा परिसरातील रहिवासी आहेत.
असे आहे संपूर्ण प्रकरण : बेनोडा आणि यशोदा नगर परिसरात गुंडगिरी करणारा प्रवीण बनसोड उर्फ पिंट्या हा हत्येच्या आरोपात अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. शनिवारी सहा जुलैला त्याचा वाढदिवस असल्यामुळं त्याचे साथीदार 'हर्ष शेरेकर' आणि 'रोहित काळे' या दोघांनी कारागृहाच्या मागून जाणाऱ्या अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर रात्री आठ वाजेच्या सुमारास फटाके फोडले. यानंतर या दोघांनी बॉम्बसदृश्य दोन वस्तू एक्सप्रेस हायवेवरून कारागृहाच्या आतमध्ये फेकल्या. यापैकी एक बॉम्बसदृश्य वस्तू हवेतच फुटली तर दुसरी कारागृहात जाऊन पडली. बॉम्बसदृश्य वस्तू कारागृहात फेकण्यात आल्यामुळं कारागृह प्रशासन हादरले होते.
दोघांना केली अटक : घटनेची माहिती मिळतात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह पोलिसांचा ताफा कारागृह परिसरात पोहोचला. बॉम्बशोधक पथकाने कारागृहाच्या आतमध्ये पडलेली बॉम्बसदृश्य वस्तू ताब्यात घेतली. यानंतर रात्रभर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, कारागृहात बंद असणारा आरोपी प्रवीण बनसोड याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या साथीदारांनी कारागृहाच्या आतमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू फेकल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी हर्ष शेरेकर आणि रोहित काळे या दोघांनाही अटक केली असल्याची माहिती, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
कारागृहाच्या भिंतीची उंची वाढविण्याच्या सूचना : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची भिंत 1992 मध्ये कारागृहाच्या मागे पंजाबमधून आलेल्या दहशतवाद्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर चार ते पाच फुटांपर्यंत वाढवण्यात आली होती. 2003 मध्ये मात्र, अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्यामागून अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे बांधण्यात आला. या एक्सप्रेस हायवेवरून कारागृहाच्या आतमधला परिसर सहज दिसतो. पोलिसांच्या वतीनं गत वीस वर्षात अनेकदा कारागृहाच्या भिंतीची उंची वाढविण्याबाबत कारागृह प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान कारागृहाच्या भिंतीची उंची वाढविण्याबाबतच प्रकरण कारागृह प्रशासनाच्या वतीनं कधीही गांभीर्याने घेतले नाही. एक्सप्रेस हायवेवरून कारागृहाच्या आतमध्ये अनेकदा गांजा फेकण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता शनिवारी चक्क बॉम्बसदृश्य वस्तू फेकण्यात आल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांच्या वतीनं आता पुन्हा एकदा कारागृहाच्या भिंतींची उंची वाढविण्याच्या सूचना कारागृह प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -