नांदेड Bullets Stock Found In Nanded : येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहराजवळ असलेल्या वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ बंदुकीच्या गोळ्यांचा साठा आढळलाय. जवळपास 436 पेक्षा जास्त बंदुकीच्या गोळ्यांचा हा साठा आहे. एका शेतकरी मुलाला हा साठा आढळून आल्यानंतर त्याने घरच्यांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा साठा जप्त केला आहे. ह्या बंदुकीच्या गोळ्यांचा साठा कोणी या ठिकाणी टाकला, याचा शोध आता नांदेड पोलीस घेताहेत.
कुतूहलापोटी गोळ्यांचे पट्टे नेले घरी : लाईट मशीनगनच्या गोळ्या असल्याची माहिती, LMG हे अत्यंत प्रतिबंधित शस्त्र, घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक, श्वान पथक दाखल होऊन तपासणी केली आहे. पावडे वाडी भागात निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात मशीनगनचे 436 राऊंड सापडले. ही घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. पावडे वाडी ते गुरुजी चौक रस्त्यावर एका निर्जन परिसरात एक शेतमजूर मोहोळ झाडण्यासाठी गेला असताना कालव्यात त्याला गोळ्या असलेले दोन पट्टे आढळले. कुतूहलापोटी त्याने हे पट्टे घरी नेले. त्याच्या वडिलांना संशय आल्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे फोटो काढून पाठवले. पोलीस कर्मचाऱ्याने लगेच ही बाब वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे राऊंड जप्त करण्यात आले आहेत. हे राऊंड अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडून असल्याने गंजले होते. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये 7.62 MM OFV-78-M-80 असे लिहिलेले 436 राऊंन्ड (काडतूस) मिळून आले.
मध काढायला गेला असता काडतूस आढळले : 1 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाची टीम हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे पावडेवाडी शिवारातील राहणारा आकाश रामराव पावडे (वय 24 वर्षे) हा पावडेवाडी शिवारातील नाल्यामधील झाडा झुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला नाल्यामध्ये राऊंन्ड (काडतूस) दिसून आले. ही माहिती प्राप्त होताच तात्काळ पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे पोलीस स्टेशन भाग्यनगर आणि वरील गुन्हे शोध पथकातील अधिकारी तसेच अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आकाश रामराव पावडे यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पावडेवाडी शिवारातील नाल्यामध्ये 436 राऊन्ड (काडतूस) नाल्याच्या मातीमध्ये अर्धवट उघडे पडलेले आणि गंजून जीर्ण झालेल्या अवस्थेत मिळून आलेले आहेत. सदर राऊंन्ड (काडतूस) ताब्यात घेतले. या राऊंन्डवर पाठीमागील फायर दर्शनी दिसून येत आहे.
या पथकाने दिली घटनास्थळी भेट : कॅपवर 7.62 OFV-78-M-80-असे कोरीव लिहिलेले आहे. त्या बाबत पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील अंमलदार यांचे मार्फतीने तपासणी केली असता सदरील राऊंन्ड हे 1978 मध्ये (46 वर्षांपूर्वी) बनवले असून ते गंजून जीर्ण होऊन निकामी झालेले आहेत. घटनास्थळी नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक किरितीका सी.एम. मॅडम, पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, दहशतवादी विरोधी पथक नांदेड, डॉग स्कॉड, नांदेड, बी.डी. डी. एस. पथक नांदेड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेबाबत अधिक चौकशी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.
हेही वाचा:
- हजारो निराधारांवर कोसळला दुःखाचा डोंगर; द्वारकामाई वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास यांचं निधन - Shirdi Srinivas Passed Away
- मुंबईत महायुतीला मोठा झटका, तर महाविकास आघाडी झेप घेणार? - Exit Poll Mumbai Survey Report
- संशयातून आणखी एक 'श्रद्धा'कांड उघड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले 14 तुकडे - husband kills wife bhopal