अमरावती Exams of Uneducated Persons : शाळा कधी पाहिलीच नाही, शाळेत कधी ते गेले नाहीत. पाटी पुस्तकाचा त्यांचा कधी संबंधच नव्हता. अक्षर ओळख नाही अंकांची ही माहिती नाही, अशा हजारो जणांनी आपल्या गावातील परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. पंधरा वर्षे वयोगटातील तरुणांपासून थेट 90 वर्षांपर्यंतच्या आजी आजोबांचा परीक्षार्थी म्हणून समावेश होता. अमरावतीच्या ग्रामीण भागात रविवारी दिवसभर या असं अक्षरांच्या परीक्षेचीच चर्चा रंगली होती.
केंद्र शासनाचा आगळावेगळा उपक्रम : देशभरातील प्रत्येकाला अक्षर ओळख यासह व्यावहारिक ज्ञान असावं या उद्देशानं केंद्र शासनाच्या वतीनं उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी देशातील अनेक राज्यांमध्ये रविवारी घेण्यात आली. ही परीक्षा घेण्यापूर्वी गावातील इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळखीसह व्यावहारिक ज्ञान देण्याबाबत वर्षभर मार्गदर्शन करण्यात आलं. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला.
150 गुणांची होती परीक्षा : पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावर भर असणारी ही परीक्षा एकूण 150 गुणांची होती. यात वाचनावर आधारित 50 गुण लेखनावर 50 गुण तर संख्या ज्ञानावर आधारित 50 गुण निश्चित करण्यात आले होते. रविवारी ग्रामीण भागात रंगलेल्या या परीक्षा उत्सवात उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागाकरिता 17 गुण असे दीडशे पैकी एकूण 51 गुण अनिवार्य होते. रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या परीक्षेसाठी वेळ निश्चित करण्यात आला होता. तीन तासाच्या कालावधीत परीक्षार्थींना पेपर सोडवावा लागला.
खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा : अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थ्यांनी कुठलंही टेन्शन न घेता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात परीक्षा दिली. यात 80-90 वर्षांचे वृद्ध देखील अतिशय उत्साहानं ही परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले. परीक्षेत त्यांना कुठल्याही प्रकारचा ताण राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाच्या वतीनं संपूर्ण काळजी घेण्यात आली. परीक्षार्थींना अल्पोपहाराची व्यवस्था देखील परीक्षा केंद्रावर करण्यात आली होती.
हेही वाचा :