कोल्हापूर - देशात अन् राज्यात वीज चोरीसाठी नागरिक नेहमीच विविध शक्कल लढवताना पाहायला मिळतात. यामुळे महावितरणाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र आता वीज चोरीच्या विरोधात कोल्हापुरात महावितरण ऍक्शन मोडवर आलीय. कमी वीज गळती आणि महसूल वसुलीसाठी कायम राज्यात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वीज चोरीच्या प्रमाणात काहीशी वाढ झालीय. या वीज चोरीच्या विरोधात महावितरणने गंभीर दखल घेत आतापर्यंत 63 वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीत वीज चोरांचे धाबे दणाणलेत.
महसूल वसुलीत कोल्हापूर जिल्हा अव्वल : राज्यात अनेक ठिकाणी वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झालीय. यामध्ये सर्वाधिक मराठवाडा भागातील बीड, उस्मानाबाद यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच राज्यात वीज गळती रोखण्यात आणि महसूल वसुलीत कोल्हापूर जिल्हा अव्वल आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही वीज चोरीचे प्रमाण वाढू लागल्याचे आकडेवारीतून समोर येतंय. गेल्या तीन वर्षांत तर कोल्हापूर जिल्ह्यात वीज चोरीचा आलेख वाढत चाललाय, यामुळे महावितरणाचे नुकसान होत असल्याने ही गंभीर बाब लक्षात घेत महावितरणाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. एका बाजूला प्रामाणिक वीजबिल भरणाऱ्यांची संख्या ही कोल्हापूर जिल्ह्यात मोठी आहे. मात्र वीज चोरीमुळे जिल्हा बदनाम होण्याची ही भीती आहे. त्यामुळे महावितरणाने थेट वीज चोरांच्या विरोधात ॲक्शन घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.
कोल्हापूर आणि सांगलीत वीज चोरांचे धाबे दणाणले : वर्ष 2023 ते मार्च 2025 अखेर जिल्ह्यात वीज अधिनियम 2003 कलम 126 प्रमाणे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील 850 ग्राहकांवर कारवाई करत 2 कोटी 35 लाख दंड ठोठावलाय. तर वीज अधिनियम 2003 च्या कलम 135 प्रमाणे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत 63 वीज ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 6 कोटी 67 लाखांची महावितरणाची फसवणूक केल्याचं या FIR मध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी करू नये, असं आवाहन करत वीज चोरांवर कठोर कारवाईची भूमिका घेत मोहीम राबवत असल्याचं महावितरण स्पष्ट केलंय. एकंदरीतच कोल्हापूर आणि सांगली जिल्हा हा नेहमी महसुलात आघाडीवर असतो. मात्र आता महावितरणाकडून 63 चोरांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगलीत वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरी करू नये, असं आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आलंय.
हेही वाचा :