नागपूर Election notification : विदर्भात आजपासून पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अधिसूचना झाली असताना अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही. महायुतीकडून नागपूर आणि चंद्रपूर येथील उमेदवारी घोषित केलेली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघडीकडून उमेदवारांची चाचपणी अजूनही सुरूच आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना पूर्व विदर्भात अजूनही सर्व राजकीय पक्षांना तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे.
नागपूर,चंद्रपूर वगळता उमेदवाराचा पत्ता नाही : खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज फुंकण्यात आलं आहे. मात्र,अद्याप नागपूर,चंद्रपूर वगळता उमेदवाराचा पत्ता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीनं नागपुरात काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. तर विदर्भातील इतर मतदारसंघांबाबत मात्र अस्पष्टता आहे.
१९ एप्रिलला मतदान - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यासाठी अधिसूचना जारी झाली झाली असून २७ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २८ मार्चला अर्जाची छाननी होईल. २९ मार्चला अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर १९ एप्रिलला विदर्भातील पाच मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
प्रशासनाची सज्जता टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याचं टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवले आहे. यासाठी "मिशन डिस्टिंगशन" सर्व मतदारांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
नागपूर मतदार संघात २ हजार १०५ मतदान केंद्र : नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एकूण ६ विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार १०५ तर रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत ६ विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार ४०५ मतदान केंद्रं उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी स्ट्राँग रुम व मतमोजणीची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमणा येथे करण्यात आली आहे. ही सर्व निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी एकूण ७ हजार ५७३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
हे वाचलंत का...