नागपूर - नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात विविध विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली तर आज विधान परिषदेतील सभापतीची निवडणूक होणार होती. मात्र आता ही निवडणूक 19 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळं विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वर्षभरापासून पद रिक्त - महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. गेल्या सरकारमध्ये देखील विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर होते. एकीकडे विधानसभा अध्यक्ष असताना दुसरीकडे मात्र विधान परिषदेवर मागील दोन वर्षापासून कोणीही सभापती नाही. उपसभापती नीलम गोऱ्हे ह्याच गेल्या 2 वर्षापासून काम सांभाळत आहेत. गेल्या दोन वर्षापासून सभापतीपद हे रिक्त आहे. त्यामुळे येथे आता सभापतीची निवडणूक होणार असून, 19 डिसेंबर रोजी नवीन सभापती मिळणार आहे. यासाठी उद्या (बुधवारी) १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे अर्ज करता येणार आहे.
१२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार - मंगळवारी विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल पी. सी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतीपद रिक्त आहे. त्यामुळं राज्यपालांनी महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम ६ मधील तरतुदीला अनुसरून सभापतींच्या निवडणुकीसाठी १९ डिसेंबर हा दिवस निश्चित केल्याचं गोऱ्हे म्हणाल्या. या पदासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी आलेल्या अर्जांची छाननी करून अंतिम उमेदवार निश्चित केले जातील, असंही उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितलं.
हेही वाचा...