मुंबई Iqbal Singh Chahal : निवडणूक आयोगानं (ECI) सोमवारी (18 मार्च) बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना पदावरुन हटवल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील GAD चे सचिव, जे सध्या संबंधित मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी सांभाळताय, त्यांना देखील निवडणूक आयोगानं आपल्या पदावरुन हटवलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंबंधित आदेश जारी केले असून, यात इकबाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, महानगरपालिका प्रकल्प विभागाचे सहआयुक्त पी. वेलरासू यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं या आदेशात ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा जे अधिकारी त्यांच्या मूळ गावी तैनात आहेत त्यांची बदली करण्यात यावी, त्यांची बदली करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाला पत्र : केंद्रीय निवडणूक आयोगानं यापूर्वी देखील एक परिपत्रक जारी करून या तीनही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. मात्र, त्यावर राज्य सरकारनं पालिकेतील सनदी अधिकाऱ्यांचा निवडणुकीच्या कामाशी थेट संबंध नसल्याचे कारणा देत त्यांना सूट देण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र, निवडणूक आयोगानं आपल्या निर्देशांवर ठाम राहत पालिका अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या कराव्यात असं स्पष्ट केलं. सरकारनं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, महानगरपालिकेतील सनदी अधिकाऱ्यांचा निवडणुकीचे कामाची थेट संबंध येत नाही. मुंबईत सध्या विविध प्रकल्प महानगरपालिका होत असून, संबंधित अधिकारी या महत्त्वपूर्ण प्रकल्पांशी संबंधित आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळं या बदल्यांना स्थगिती देण्यात यावी.
कोण आहेत इकबाल सिंह चहल? : इकबाल सिंह चहल हे महाराष्ट्र केडरचे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यामध्ये ते चार वर्षे ठाण्याचे जिल्हाधिकारी, चार वर्षे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अशा विविध विभागांमध्ये काम केलं आहे. सोबतच कोरोना काळात त्यांनी केलेलं काम धारावीसारख्या भागात नियंत्रणात आणलेले कोरोनाचे रुग्ण यामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. तसंच त्यांनी कोस्टल रोड प्रकल्प, पालिका रुग्णालयांचे अपग्रेडेशन आणि आधुनिकीकरण, नवीन रस्त्यांचे बांधकाम, मुंबईचे सुशोभीकरण आणि डीप क्लीन ड्राईव्ह सारख्या प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सहा राज्यांतील सचिवांना पदावरुन हटवलं : निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोगानं अनेक राज्यांमधील शीर्ष ब्युरोक्रॅट्सच्या बदलीचे आदेश दिले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना निवडणूक आयोगानं आपल्या पदावरुन हटवलं आहे. याशिवाय मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आलं आहे. तसंच सहा राज्यांमधील ज्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आलंय, त्यांच्याकडं संबंधित राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दुहेरी कार्यभार असल्याचं आढळून आलं आहे.
हेही वाचा -
- देशाच्या आर्थिक राजधानीचा तब्बल 60 हजार कोटींचा अर्थसंकल्प, निवडणुकाच न झाल्यानं यावर्षी देखील नगरसेवकांची अनुपस्थिती
- Aditya Thackeray Letter To Chahal : आमदार आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र! ठेकेदारांची अनामत रक्कम रोखण्याची मागणी
- Provisions in BMC Budget 2023: जुन्या घोषणांसाठी कोट्यावधींची तरतूद; रस्ते, आरोग्य, पर्यावरणावर पालिकेचा भर