मुंबई - जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येतेय. तसतसे राजकीय वातावरण फारच तापू लागलंय. पालघरचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापल्याने ते नाराज असून, गायब झालेत. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय. तसेच राज्यात निवडणुकीच्या रणसंग्रामात पोलिसांकडून एकतर्फी कारवाई होत असल्याकारणाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्काळ बदली करावी, अशी विनंतीही त्यांनी केलीय. ते मुंबईत बोलत होते.
याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे लोक पराभवाच्या भीतीने अस्वस्थ झालीत. अनेक ठिकाणी आमच्या लोकांना धमक्या दिल्या जाताहेत. पोलिसांचा दबाव आणून खोटे गुन्हे दाखल केले जाताहेत. यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्तसुद्धा सामील आहेत. मालेगाव मध्यचे आमचे उमेदवार डॉ. अद्वय हिरे हे प्रचारात असताना त्यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केलाय. अद्वय हिरे यांना ठार मारण्याचा प्रयत्न झालाय. आमचे पाच कार्यकर्ते जखमी झालेत. परंतु पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केली नाही. या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी आमची होती. पोलीस यंत्रणा एका राजकीय पक्षाच्या कामाला जुंपलीय. म्हणून निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाहीत. हा आमचा अंदाज आता खरा ठरताना दिसतोय. राज्याचे गृहमंत्री दररोज जीपमध्ये बसून प्रचार करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवडणुका जिंकण्यासाठी राज्याचे दौरे करीत आहेत. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना माझी विनंती आहे की, तुम्ही राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.
आघाडी धर्माचं पालन करणार: संजय राऊत पुढे म्हणाले की, दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे अमर पाटीलच असतील. इतरांनी फॉर्म भरले आहेत. परंतु त्यांना त्या पक्षाची मान्यता नाही. परांडाबाबत मार्ग काढला जाईल. जिथे समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे आम्ही अर्ज भरलेले नाहीत. किंबहुना जिथे आमचे उमेदवार आहेत, तिथे समाजवादी पक्षाने उमेदवार दिलेत. परंतु आम्ही आघाडी धर्माचं पालन करणारे आहोत. शेकापला रायगडमधील आमच्या कोट्यातील दोन-तीन जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत. मनसे आणि सदा सरवणकर यांचा पक्ष हे एकाच आघाडीचे आहेत. आमच्याकडे जेव्हा याची चर्चा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. माहीमच्या जागेवरून फार बाऊ करू नका. अनेक नेत्यांची मुलं निवडणूक लढवतात, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
मी त्यांना कुठल्यातरी टेबलावर नाचतानाही पाहिलं: पालघरचे एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना शिंदे गटाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होऊन मागील १२ तासांपासून गायब आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, श्रीनिवास वनगा हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. वनगा कुटुंब हे भाजपाशी संबंधित कुटुंब होतं. चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी वनगा कुटुंब दत्तक घेतलं. उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना लोकसभेला उमेदवारी दिली. पण ते पराभूत झाले. नंतर विधानसभेला उमेदवारी दिली. पण हे महाशय एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, मी त्यांना कुठल्यातरी टेबलावर नाचतानाही पाहिलं. आता ते रडत आहेत. हा पश्चाताप आता सर्वांना होणार आहे. २६ तारखेनंतर एकनाथ शिंदेसुद्धा रडतील. ही सर्व कर्माची फळं असतात. उद्धव ठाकरे हे देव माणूसच आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.
हेही वाचाः