सातारा : सत्ता स्थापनेचा पेच असतानाही राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळगावी आले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांची तब्येत बिघडल्यानं ते कोणालाही भेटले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलं होतं. तब्बल दोन दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत सविस्तर संवाद साधला.
आरामासाठी मी गावी आलो : "माझी तब्येत ठीक आहे. आरामासाठी मी गावी आलो होतो. अडीच वर्षात मी सुट्टी घेतली नाही. निवडणूक काळातही खूप मेहनत घेतली होती. त्यामुळं थोडा आराम करण्यासाठी मी गावाला आलो होतो," अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात पत्रकारांसोबत बोलताना दिली. दोन दिवसानंतर त्यांनी आज प्रतिक्रिया दिली.
आमच्यात काहीच वाद नाहीत : "कोण मुख्यमंत्री होणार? अर्थमंत्रिपद तसंच गृहमंत्रिपद पाहिजे या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली होती. आता महायुतीच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. यात राज्याच्या हिताचा निर्णय होणार आहे. जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत. आमच्यात काहीच वाद नाही. सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत. जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होणार आहे. जनतेनं आम्हाला भरभरून दिलं," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
मोदी, शाह यांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा : "मुख्यमंत्री म्हणून मी जे काही काम केलं, त्यामुळं मी मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची भावना साहजिक आहे. माझ्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत होते. संभ्रम नको म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. दिल्लीत बैठकही झाली होती. त्यामुळं मोदी आणि शाह हे जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असणार," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधकांवर हल्लाबोल : "विरोधकांना विरोधी पक्षनेताही करता येत नाही. त्यामुळं ईव्हीएम विषय बाहेर काढत आहेत. लोकसभा निवडणूक, झारखंड, तेलंगाणा, कर्नाटकमध्येही विरोधकांना यश मिळालं. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमवर सवाल का नाही उपस्थित केले? त्यामुळं आता विरोधकांना काही काम राहिलं नाही. त्यांनी थांबवलेले कामं आम्ही पूर्ण केली आहेत," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
ताप आणि घशाच्या संसर्गानं पडले आजारी - महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळगावी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (शनिवारी) एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या शरीराचं तापमान १०४ डिग्री होतं. ताप, कणकण आणि घशाच्या संसर्गामुळं दिवसभर ते घराबाहेर पडले नाहीत. नेहमीप्रमाणे त्यांना शेतातदेखील जाता आले नाही. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही त्यांनी टाळल्या. चार डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती.
सहकुटुंब जननी देवीचं दर्शन घेतलं : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरनं ठाण्यात दाखल झाले. मुंबईला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब जननी देवीचं दर्शन घेतलं. तसंच त्यांनी दरे गावात पत्रकारांसोबत संवाद साधला.
हेही वाचा -