मुंबई Eknath Shinde notice to Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातील आणि राज्यातलं शेवटचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. तरी देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबताना दिसत नाहीत. दररोज नेत्यांकडून परस्परांवर वेगवेगळे आरोप होतायत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर, नाशिक दौऱ्यात पैसा वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या आरोपानंतर पुढील दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व बॅगा तपास यंत्रणांकडून तपासून घेतल्या होत्या. या बॅगांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कपड्या व्यतिरिक्त काहीही नसल्याचं त्यांनी दाखवलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप थांबवावे, असं त्यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस : या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर फर्ममार्फत खासदार संजय राऊत यांना बिन बुडाचे आरोप केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत बिनबुडाचे होते. आपण कधीही कुठंही पैशाचा वापर केला नाही. आपल्या सोबत असलेल्या बॅगात साहित्य होतं. मात्र, तरीही संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांनी तीन दिवसात बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
'अब आएगा मजा' : खासदार संजय राऊत खासगी दौऱ्यानिमित्त परदेशात आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली नोटीस मिळाली असून त्यांनी ही नोटीस ट्विट केली आहे. या नोटीसीला प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. ही नोटीस म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे', लेकिन अब आएगा मजा, जय महाराष्ट्र, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. या नोटिशीला आपण घाबरत नसून नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं राऊतांनी म्हटलंय.
हे वाचलंत का :
- जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी चौकशी सुरू - Jarandeshwar Sugar Factory Case
- सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींना भोवणार? पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती - RAHUL GANDHI News
- राज्याला बसताहेत दुष्काळाच्या झळा, काँग्रेस नेते करणार दुष्काळी पाहणी दौरे - Congress On Draught Situation