मुंबई Supriya Sule on ED : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारवर सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून वारंवार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनी प्रकरणी ईडीनं त्यांना बुधवारी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. त्यामुळं रोहित पवार बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.
सध्या आव्हानाचा काळ : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. सध्याचा काळ हा आव्हानांनी भरलेला काळ आहे. ही वेळ संघर्षाची आहे, त्यामुळं आपल्याला खचून चालणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी संयमानं लढलं पाहिजे, याविरोधात सर्वांनी एकजुटीनं लढा देऊन अडचणींवर मात केली पाहिजे, सुळे यांनी 'X' साइटवर अशा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार प्रदेश कार्यालयात : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ठाण मांडून बसणार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ईडीच्या विरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात येणार असल्याचं समजतंय.
शरद पवारांसोबत उभं राहावं : रोहित पवार यांनीही याबाबत 'X' या साइटवर ट्विट केलं आहे. आपण यापूर्वीही ईडीला सहकार्य केलं होतं. तसंच उद्या तपासादरम्यान सहकार्य करू. सध्याचं राजकारण पाहता सर्व यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे. ईडीकडून चुकीची कारवाई होत असेल तर कोणी घाबरू नये. उलट शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहावं. तसंच स्वाभिमानाचं रक्षण करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं, महाराष्ट्राचा धर्म जपण्याचं काम करावं, असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय.
सत्तेचे गुलाम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार गटावर निशाणा साधला जात आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार हुकूमशहा असल्याचं नमूद केलं आहे. त्यावरून सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारा व्हिडिओ शरद पवार गटानं अधिकृत 'एक्स' साइटवर टाकला आहे. सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्रानं ऐकली आहे, पण आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत असल्याचं शरद पवार गटानं ट्विटमध्ये म्हटलंय.
हे वाचलंत का :