मुंबई- हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी ४.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी झाला. या भूकंपाची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात ( National Center for Seismology) झाली. भूकंपाबाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं सोशल मीडियात पोस्ट करून माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यात अचानक झालेल्या भूकंपानं नागरिक भयभीत झाले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यात सकाळी 6:09 व 6:19 मिनिटे अशा दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. "भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र सतर्क राहावं. घराचे छत पत्र्याचे असेल तर त्यांनी नागरिकांनी पत्र्यावरील दगड त्वरित काढून घ्यावेत, "असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
भूकंपानं कोणतेही नुकसान नाही-नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता सकाळी ६ वाजून ९ मिनिटाला 4.5 रिश्टर स्केल व ६ वाजून १९ मिनिटाला 3.6 रिश्टर स्केल अशी नोंदविण्यात आलेली आहे. नांदेडमधील भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात आहे. सुदैवानं नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यानं कुठेही नुकसान झालेलं नाही.
हिंगोलीमध्ये भूगर्भातून येतो आवाज- गेल्या पाच वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर अनेकवेळा भूगर्भातून आवाज होत असल्याचं प्रकार समोर आले आहेत. कळमनुरी वसमत तालुक्यातील काही गावात भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतानाच आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूगर्भातtन आवाज आला. त्यानंतर भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात एक भिंत कोसळल्याचा दावा केला जात आहे. भूकंपाचे धक्के बसल्यानं अनेक नागरिक घराबाहेर पडले आहेत.
हेही वाचा-